पिंपरी : संततधार पावसामुळे भर वस्तीतील लिंबाचे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडले. कासारवाडी येथे मंगळवारी पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. सुदैवाने रस्त्यावर कोणी नव्हते, त्यामुळे हानी टळली.
कासारवाडी ते पिंपळे गुरव मार्गावर मयूर मेडिकलसमोर असलेले हे झाड पहाटेच्या सुमारास उन्मळून पडले. त्यामुळे दिवसा भरपूर रहदारी असणारा हा रस्ता बंद झाला. येथील रहिवासी देविदास तुपे यांनी याबाबतची माहिती जवळच राहणाऱ्या माजी नगरसेवक किरण मोटे यांना कळवली. मोटे तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अग्निशामक दलाच्या पथकाने रस्त्यावर आडवे पडलेले झाड बाजूला केले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. झाड पडले तेव्हा पहाटेची वेळ होती. त्यामुळे रस्त्यावर पादचारी, विक्रेते किंवा वाहनस्वार कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.