पुणे : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणातील भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पदांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रुपांतरित फेरीमध्ये ५ हजार ७१४ रिक्त पदांपैकी ३ हजार १५० पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, २ हजार ५६४ पदांच्या विषयांसाठी त्या आरक्षणाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने ती पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.

शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारात २५ फेब्रुवारी रोजी ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादीद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी ६ हजार १८२ उमेदवार शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने जागा रिक्त आहेत. त्यात माजी सैनिक, भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवारांच्या उपलब्धतेबाबत पुन्हा पडताळणी करून भरतीच्या कार्यवाहीचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवून शासनाला सादर केली. त्यानंतर माजी सैनिकांची ४८४ पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे रुपांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली. तर भूकंपग्रस्त प्रवर्गातील उमेदवारांच्या उपलब्धतेबाबतची पडताळणी पवित्र संकेतस्थळावरील स्व-प्रमाणपत्राच्या आधारे करण्यात आली. त्यानंतर या प्रवर्गातील रिक्त पदे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण पदांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार रुपांतरित फेरीची कार्यवाही तीन आठवड्यांत पूर्ण करण्यात आली. रुपांतरित फेरीत शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये पहिली ते पाचवीसाठी १ हजार ६५७, सहावी ते आठवीसाठी १ हजार ४८३, नववी ते दहावीसाठी दहा उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचा – पिंपरी : अलंकापुरीत वैष्णव दाखल! इंद्रायणीकाठी स्नानासाठी गर्दी, वडिवळे आणि आंद्रा धरणातून पाणी सोडून इंद्रायणी नदी स्वच्छ

रुपांतरित फेरीतील निवडीच्या अनुषंगाने उमेदवारांची काही तक्रार असल्यास त्या नोंदवण्यासाठीचा तक्रार अर्ज पवित्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली पदे, मुलाखतीसह भरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न आहे. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांवर माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरी घेण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – पुणेकरांना खुषखबर! गणेशोत्सवात मेट्रोची स्वारगेटपर्यंत धाव

स्वप्रमाणपत्रात दुरुस्तीची संधी…

स्वप्रमाणपत्रांमध्ये चुकीची, अर्धवट, अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये शिफारस झाली नाही, त्यांच्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी स्वप्रमाणपत्रात दुरुस्ती करण्याची सुविधा दिली जाणार आहे. नव्याने जाहिराती घेऊन निवडप्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रातील बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.