पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेला रखवालदार बिहार येथे २१ वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी ३५ लोकांच्या हत्येप्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले आहे.
खडक पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्य़ात रामजनम देवीलाल सिंग (वय ६५, रा. सुतारवाडी, मूळ- गया, बिहार) याला अटक केली होती. त्याच्याकडे तपास केला असता तो बिहारमधील १९९२ साली नक्षलवाद्यांनी बारागाव येथील उच्चवर्णीय भूमी हरी ब्राह्मण वर्गातील ३५ लोकांची हत्या केली होती. या गुन्ह्य़ात आपले नाव असल्याचे सांगत होता.  याबाबत खडक पोलिसांनी बिहारमधील गुन्हा दाखल असलेल्या ‘टेकारी’ पोलीस ठाण्यात संपर्क साधून चौकशी केली. त्यावेळी १९९६ मध्ये याच पोलीस ठाण्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला करून पोलीस ठाणे जाळून टाकले होते. त्यामध्ये ठाण्यातील सर्व कागदपत्रे जळून गेल्यामुळे या गुन्ह्य़ाची कागदपत्रे मिळण्यास उशीर झाला होता. मात्र, त्या गुन्ह्य़ाची कागदपत्रे पाहिली असता सिंग हा त्यामध्ये आरोपी असल्याचे दिसून आले होते. त्याला घेण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले आहे. सिंग घरफोडीच्या गुन्ह्य़ात सध्या न्यायालयीन कोठडीत असून तो सध्या येरवडा कारागृहात आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो पुण्यात विविध ठिकाणी सुरक्षारक्षकाची नोकरी करत असल्याचे समोर आले आहे.