अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ज्या पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये आता अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी राजकीय डावपेच बघायला मिळणार आहेत. शहरात अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे पक्ष कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच शरद पवार गटाकडून नुकतंच शहराध्यक्ष म्हणून तुषार कामठे यांची निवड करण्यात आली आहे. असं असताना आता शरद पवार यांचे विश्वासू आमदार रोहित पवार हे आज दिवसभर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असून भक्ती-शक्ती निगडी ते पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दुचाकी रॅली काढण्यात आली.
अनेक कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला. स्वतः रोहित पवार यांनी दुचाकी चालवली. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये अजित पवार आणि पिंपरी- चिंचवडचे कौतुक करताना दिसत होते. अनेकदा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पिंपरी-चिंचवडचा कायापालट हा अजित पवार यांनीच केला आहे, असं सांगत अजित पवारांच्या पाठीवर शाब्बासकी दिली. परंतु, आता याच पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी राजकीय लढाई बघायला मिळणार आहे.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवडमधील मालमत्तांना मिळणार ‘युपीक आयडी’
आज सकाळी शरद पवार यांचे विश्वासू रोहित पवार यांनी भक्ती-शक्ती समूह शिल्पाला अभिवादन करून दुचाकी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. त्याचबरोबर रोहित पवार हे सेना भवन या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. त्यांची मते जाणून घेणार आहेत.
हेही वाचा – ऐन गणेशोत्सवात प्रवासी वाऱ्यावर! खासगी बसच्या भाड्यावर नावालाच नियंत्रण
रोहित पवार यांची पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी रॅली पहिल्यांदाच होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता होती. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने अजित पवार गट आणि भाजपा यांना आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढावी लागणार हे ही तितकंच खरं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या हातून पिंपरी-चिंचवड खेचून आणण्यासाठी पुतणे रोहित पवार कामाला लागले आहेत, असे बोललं जातं आहे.