मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वारजे भागातील डुक्कर खिंडीत ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. बाह्यवळण मार्गावर थांबलेल्या मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वार तरुण रस्त्यात पडला. त्यानंतर वारजे पुलाकडे निघालेल्या ट्रकने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली.या प्रकरणी ट्रकचालकासह मोटार चालकाच्या विरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बाजीराव सोमनाथ गवळे (वय ३०, रा. शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालकासह मोटारचालक वसीम मुस्कीन सय्यद (वय ३४, रा.पीएस समृद्धी सोसायटी, कोंढवा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई संतोष रामदास पवार यांनी या संदर्भात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार गवळे बाह्यवळण मार्गावरील डुक्करखिंडीतून वारजे पुलाकडे निघाला होता. त्या वेळी मोटारचालक सय्यद हा वारजे पुलाकडे निघाला होता. सय्यदच्या मोटारीत बिघाड झाल्याने सय्यदने मोटार बाह्यवळण रस्त्यावर मधोमध थांबविली. त्या वेळी मोटारीचा दरवाजा उघडा होता.
हेही वाचा– डाळिंबाचा बोगस विमा काढणारी टोळी सक्रिय
दुचाकीस्वार गवळे मोटरीच्या दरवाज्यावर आदळला आणि नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या मधोमध पडला. त्या वेळी भरधाव वेगाने वारजे पुलाकडे निघालेल्या ट्रकने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वार गवळेला धडक दिली. अपघातात गवळेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पाेलीस उपनिरीक्षक पडवळे तपास करत आहेत.