पुणे : कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याची घटना हडपसर भागात घडली. या घटनेत पोलीस हवालदाराला दुखापत झाली असून, दुचाकीस्वाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
ऋतिक प्रकाश हिंगणे (वय २३, रा. हिंगणे मळा, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत लाेणी काळभोर वाहतूक विभागातील पोलीस हवालदार चेतन सुलाखे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार हिंगणे हडपसर ओैद्योगिक वसाहत परिसरातून भरधाव वेगाने निघाला होता.
हे ही वाचा…पुणे : पतीच्या त्रासामुळे महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या,पतीला दहा वर्षे सक्तमजूरी
तेथे वाहतूक नियमन करणारे पोलीस हवालदार सुलाखे यांनी त्याला पाहिले. त्यांनी हिंगणेकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत मागणी केली. वाहन परवाना दाखविण्यास सांगितले. त्यानंतर हिंगणेने दुचाकी भरधाव वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. हवालदार सुलाखे यांनी त्याचा दंड पकडला. सुलाखे यांना फरफटत नेऊन दुचाकीस्वार हिंगणे पसार झाला. सुलाखे यांना दुखापत झाली. सहायक पोलीस निरीक्षक सतार तपास करत आहेत.