आतापर्यंत १,६६६ गुन्हे दाखल
पुणे : ‘दुचाकींचे शहर’ अशी ओळख असलेल्या पुणे शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीस जात असून नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत शहरातून दुचाकी, तीन चाकी वाहने, मोटारी अशी एक हजार ६६६ वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> राज्यात ५० लाख युनिटची वीजचोरी उघडकीस; महावितरण विभागाच्या मोहिमेला यश
शहरातील गर्दीची ठिकाणे, सोसायटीतून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शासकीय कार्यालये, रुग्णालयांच्या परिसरात लावलेल्या दुचाकी चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोसायटीच्या आवारात लावलेल्या मोटारी चोरीला जाण्याच्या घटना घडतात. शहरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शहरातून दुचाकी चोरून त्याची परगावात तसेच परराज्यात विक्री केली जाते. वाहन चोरीचे गुन्हे आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण विचारात घेतल्यास चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
वाहन चोरीला गेल्यानंतर पुन्हा सापडत नाही. शहरातील वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चोरट्यांचा माग काढण्यास मदत होते. मात्र, वाहन चोरल्यानंतर चोरटे वाहन क्रमाकांची पाटी बदलतात. वाहनाच्या चॅसीवरील क्रमांक बदलतात. त्यामुळे वाहन चोरीला गेल्यानंतर त्याचा शोध घेणे कठीण होते. वाहन चोरीची तक्रार दिल्यानंतर ते परत मिळत नाही. पुणे शहरात नोकरी-व्यवसाय, शिक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिक स्थायिक झाले आहेत. कर्जावर घेतलेले वाहन चोरीला गेल्यानंतर त्याची झळ सामान्यांना सोसावी लागते.
वाहन चोरट्यांना पकडण्याची योजना कागदावरच
यंदा नोव्हेंबर महिना अखेरीपर्यंत शहरातून एक हजार ६६६ वाहने चोरीस गेली आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी गस्त घालण्यात येते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात येतो. गुन्हे शाखेकडून वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी पथकही तयार करण्यात आलो आहे. वाहन चोरट्यांना पकडण्यासाठी आखलेली योजना कागदावरच असून वाहन चोरट्यांना पकडण्यात अपयश आले आहे. वाहन चोरीचे सर्वाधिक गुन्हे उपनगरात घडतात.
शहरातील वाहन चोरीचे गुन्हे
परिमंडळ वाहन चोरीचे गुन्हे
परिमंडळ एक २१८
परिमंडळ दोन २२२
परिमंडळ तीन २२३
परिमंडळ चार ४०१
परिमंडळ पाच ६०१
(आकडेवारी १७ नोव्हेंबरपर्यंत )