पुणे : मार्केटयार्ड-गुलटेकडी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नेल्सन पाॅल डिसोझा (वय ५०, रा. ज्ञानेश्वर काॅलनी, कासारवाडी, मुंबई-पुणे रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी एका दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डिसोझा यांचा मुलगा गैारीश (वय १९) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार नेल्सन हे ३१ जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास मार्केटयार्ड-गुलटेकडी उड्डाणणुलावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार नेल्सन यांना धडक दिली. अपघातात नेल्सन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघात करणारा दुचाकीस्वार पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या नेल्सन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक शैलेश आलाटे तपास करत आहेत. गुलटेकडी उड्डाणपुलावर यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात झाले आहेत. मार्केट यार्ड, तसेच सेव्हन लव्हज चौकाकडून ये-जा करणारी भरधाव वाहने या उड्डाणुलाचा वापर करतात. भरधाव वेगामुळे उड्डाणपुलावर अपघात घडतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.