पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना आज (१४ जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. कैलास पवार असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दुचाकीस्वाराच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन ८ टाके पडले आहेत. तसेच, मांजा बाजूला करताना त्यांची बोटं देखील कापली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर नायलॉन मांजावर बंदी आहे. मात्र, असं असतानाही काही दुकानदार सर्रास नायलॉन मांजाची विक्री करतात. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास पवार हे दुचाकीवर भोसरीवरून नाशिक फाट्याकडे येत होते. तेव्हा लांडेवाडी येथील चढावरून दुचाकी येत असताना त्यांना गळ्याला काही तरी चावा घेत आहे असं वाटलं. त्यांनी गळ्याला हात लावला, तर गळा रक्तबंबाळ झाला होता.

हेही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय जोरात, २० दिवसांमध्ये ३८ महिलांची सुटका, १७ जणांना बेड्या

“मांज्यामुळे गळ्याला झालेल्या जखमेला ८ टाके टाकण्याची वेळ”

मांजा हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता हाताची बोटं देखील कापली गेली. ही घटना सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली, अशी माहिती कैलास पवार यांनी दिली. पवार हे तातडीने रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून गळ्यावरील जखमेला ८ टाके टाकण्यात आले. या घटनेमुळे पुन्हा एकदा नायलॉन मांजा हा जीवावर बेतू शकतो हे अधोरेखित झालं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biker injured due to nylon manja in pimpri chinchwad on makar sankranti kjp pbs