ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या वर्षभरापासून बिंदुमाधव जोशी हे हृदयाच्या आणि फुफ्फुसाच्या विकाराने आजारी होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गेल्याच आठवडय़ात उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. रविवारी दुपारी जोशी यांची प्राणज्योत मालवली. कसबा पेठ येथील पसायदान या निवासस्थानी जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिंदुमाधव जोशी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३१ रोजी अनंत चतुर्दशीला झाला. त्यांचे वडील बटुकभैरव जोशी हे लोकमान्य टिळक यांचे अंगरक्षक होते. त्यांचा प्रभाव असल्यामुळे बिंदुमाधव जोशी यांनी तालमीत जाऊन बलोपासना केली होती. स. प. महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. पदवी संपादन केली. १९५४ मध्ये दादरानगर हवेली येथील पोर्तुगीज राजवटीच्या विरोधात झालेल्या सशस्त्र उठावात भाग घेतला होता. पुढे ते गोवा मुक्तिसंग्राम लढय़ात सहभागी झाले होते. देशभरातील ग्राहकांना संघटित करण्याच्या उद्देशातून १९७४ मध्ये त्यांनी पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्राहक पंचायतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. सर्वसामान्य ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देणारी ही चळवळ देशभर फोफावली. जोशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला. राज्यामध्ये भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर असताना १९९५ मध्ये ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती. कॅबिनेट दर्जा असलेल्या या समितीचे अध्यक्षपद बिंदुमाधव जोशी यांनी भूषविले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा