राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये जैवविविधता समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिले आहे. आमदार मोहन जोशी यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या एका मुद्दय़ावर जाधव यांनी हे आश्वासन दिले आहे.
मोहन जोशी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. ‘केंद्र शासनाच्या जैवविविधता अधिनियमानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे सक्तीचे आहे. मात्र राज्यातील एकाही महानगरपालिकेने या अधिनियमाचे पालन केलेले नाही. नागरिकांमध्ये पर्यावरण व पाणी याविषयी साक्षरता निर्माण करण्याच्या कामासाठी ही समिती महानगरपालिकांत स्थापन होणे आवश्यक आहे.’ असे जोशी यांनी म्हटले आहे.