सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आणि विठ्ठलभक्तीपर अभंगरचनेने संतपदाचा बहुमान लाभलेल्या संत कान्होपात्रा यांचे दुर्मिळ ओवीबद्ध चरित्र नुकतेच उपलब्ध झाले आहे. मंगळवेढा येथील बसविलग यांनी २३८ वर्षांपूर्वी ३६ ओव्यांमध्ये कान्होपात्रा यांचे आत्मचरित्र मांडले आहे.
जुन्या हस्तलिखितांचे अभ्यासक आणि संग्राहक वा. ल. मंजूळ यांना मंगळवेढा येथे कान्होपात्रा यांचे हे ओवीबद्ध चरित्र सापडले आहे. तेथील धार्मिक ग्रंथांचे संकलन करणाऱ्या एका व्यक्तीकडे हे छोटेखानी बाड उपलब्ध झाले आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे चरित्र आढळून आले त्यांनी आपले नाव प्रसिद्ध करू नये, अशी इच्छा मंजूळ यांच्याकडे प्रदर्शित केली आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील मांदियाळीमध्ये कान्होपात्रा या महत्त्वाच्या संत असून ‘सकल संत गाथे’ मध्ये कान्होपात्रा यांचे २३ अभंग आहेत. बसविलग यांची काव्यरचना हे चरित्र शके १६९९ म्हणजेच १७७७ मधील आहे. पूर्वी मंगळवेढा या भागाला मंगोडा असे म्हटले जात असे. केवळ ३६ ओव्यांमध्ये कान्होपात्रा यांचे चरित्र काव्यबद्ध केले आहे. हे काव्य देवनागरी लिपीमध्ये असून सुमारे २५० वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेचे वैभव त्यातून दिसते, अशी माहिती वा. ल. मंजूळ यांनी दिली.
सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली कान्होपात्रा यांच्या सौंदर्याचे वर्णन सुरुवातीच्या ओवीमध्ये आहे. त्यांनी सेवन केलेल्या विडय़ाचा रस गळ्यातून जाताना दिसे. नृत्यकला आणि गांधर्वगायनामध्ये पारंगत कान्होपात्रा मातेसह पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनास आल्या. भीमेच्या पात्रामध्ये त्यांना कान्हो म्हणजेच कृष्णाची आठवण आली. कृष्णाचेच रूप असल्याने कान्होपात्रा यांनी विठ्ठलाची भक्ती केली. बिदरच्या बादशहाने मागणी घातल्यानंतर देवाच्या पायी मस्तक ठेवून कान्होपात्रा गतप्राण झाली. बडव्यांनी मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये कान्होपात्रा यांची समाधी केली आणि या समाधीवर तरटाचे झाड लावले. या झाडाची पाने सेवन केली तर यात्रा पूर्ण होते अशी वारकरी आणि भाविकांची श्रद्धा आहे. तर, काही भाविक या झाडाची पाने आपल्या संग्रही ठेवण्यासाठी घेऊन जातात. मंगळवेढा येथे एका कुटुंबाच्या पडवीमध्ये कान्होपात्रा यांची दीड फूट उंचीची मूर्ती होती. पाच वर्षांपूर्वी रखुमाईसारखी कमरेवर हात ठेवलेली नवीन दोन फूट उंचीची मूर्ती बसविण्यात आली आहे. संत कान्होपात्रा यांच्या मंदिरासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचेही वा. ल. मंजूळ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा