शहरात जवळपास पाच ते सात हजार दवाखाने (क्लिनिक) असून पालिकेकडे जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी नोंदणी करणाऱ्या क्लिनिक्सची संख्या मात्र केवळ २९०० आहे. काही ठिकाणी डॉक्टरांकडून चक्क दारोदार फिरुन कचरा उचलणाऱ्या कचरावेचकांकडेच दवाखान्याचा कचरा सोपवला जात असल्याचेही समोर आले आहे.
जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नेमण्यात आलेल्या यंत्रणेकडे नोंदणी केलेल्या रुग्णालयांची संख्या ६२० असून नोंदणीकृत क्लिनिक्सची संख्या २९०० आहे. गेल्या वर्षी या यंत्रणेद्वारे ९९६ टन जैववैद्यकीय कचरा उचलला गेला होता.
प्रत्यक्षात अजून कमीत- कमी दोन हजार क्लिनिक्सची नोंदणी होणे अपेक्षित असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘सर्व जनरल प्रॅक्टिशनर्सनी जैववैद्यकीय कचऱ्यासाठी नोंदणी केलेली नाही. जैववैद्यकीय कचरा उचलणाऱ्या यंत्रणेसाठी भरावे लागणारे पैसे अधिक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु राज्यात सर्वात कमी दर पुणे पालिकेचाच आहे. दर कमी झाल्यावर जैववैद्यकीय कचऱ्यासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढेल असे डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले होते, मात्र तसे झाले नसून गेल्या वर्षभरात केवळ चारशे नवीन क्लिनिक्सची नोंदणी झाली. अजून कमीत-कमी दोन हजार क्लिनिक्सनी नोंदणी केली नसल्याचा आमचा अंदाज आहे. त्यासाठी आम्ही वारंवार आवाहन केले आहे. नोंदणी न करणाऱ्या डॉक्टरांवर कोणत्या पद्धतीने कारवाई करता येईल यासाठी विधी विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सल्ला घेत आहोत.’’
कचरावेचकांना कचऱ्यात सापडताहेत
इंजेक्शनच्या सुया आणि वापरलेले बँडेज!
दारोदार फिरुन ओला आणि सुका कचरा उचलणाऱ्या कचरावेचकांकडे दवाखान्याच्या कचऱ्यातून सििरज आणि वापरलेल्या बँडेज पट्टय़ांसारखा कचरा येत असल्याचा अनुभव ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचक रिबेका केदारी यांनी सांगितला. त्या म्हणाल्या,‘‘चार- पाच महिन्यांपूर्वी माझा मुलगा एका डॉक्टरांकडून कचरा उचलत असताना त्याच्या हाताला इंजेक्शनची सुई टोचून हातातून रक्त येऊ लागले. तसाच हात घेऊन तो संबंधित डॉक्टरांना दाखवायला गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या हातावर दोनशे रुपये ठेवून माफी मागितली. पण दोनशे रुपये घेऊन आम्ही काय करु? सिरिंज टोचून एखाद्या कचरावेचकाला मोठा आजार देखील होऊ शकतो. इंजेक्शन भरताना त्याची लहान बाटली फोडली जाते. त्याच्या बारीक- बारीक काचाही कचऱ्यात येतात.’’
 ‘दवाखान्यात येऊन कचरा उचलायला हवा’
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. संताजी कदम म्हणाले, ‘‘जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी पालिकेने नेमलेल्या यंत्रणेचा दर अधिक आहेच, पण या यंत्रणेच्या गाडय़ा ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळेला थांबतात आणि क्लिनिकमधून तिथपर्यंत जाऊन कचरा द्यावा लागतो. क्लिनिकमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी असते, तसेच धावपळीमुळे प्रत्येक डॉक्टरला तिथपर्यंत जाऊन कचरा देणे जमत नाही. त्याऐवजी दर आठवडय़ात एकदा किंवा दोनदा प्रत्येक क्लिनिकमध्ये जाऊन कचरा गोळा केल्यास हा प्रश्न सुटू शकेल. अशी सेवा मिळाल्यास डॉक्टर काही पैसे अधिक देण्यास तयार होतील. काही डॉक्टर वापरलेल्या इंजेक्शनच्या सुया ‘निडल डिस्ट्रॉयर’ वापरुन नष्ट करतात तसेच कमी प्रमाणातील जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची मशीन वापरतात.’’

Story img Loader