यंदा लांबलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पेरण्यांना उशीर झाला. वेळेत झालेल्या पेरण्या आणि पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या ज्वारीची कणसे सध्या फुलोऱ्यात आहेत. काही दिवसांनी त्याचा हुरडा होईल, मात्र त्यापूर्वीच पक्ष्यांकडून कणसांचा फडशा पाडला जात आहे. आजूबाजूच्या शिवारात पक्ष्यांना खाण्यायोग्य काहीच पीक नसल्याने पक्ष्यांचा मोर्चा ऐन फुलोऱ्यात आलेल्या ज्वारीकडे वळला आहे. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांत ही स्थिती असून, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे बहुतांश भागात हुरडा पार्ट्यांवरही परिणामाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाला लवकरच मान्यता; जतमधील ६५ गावांना पाणी
हुरडा होण्यापूर्वीच कणसे रिकामी होत असल्याने शेतकऱ्यातून तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बहुतांशी ठिकाणी यंदा ज्वारी तर सोडाच, परंतु हुरड्यासाठी तरी चांगली कणसे मिळतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात आणि इतर भागातही ज्वारीच्या पिकाजवळ असलेल्या उसाच्या क्षेत्राच्या भागात ही स्थिती प्रामुख्याने दिसून येत आहे. उसाचे, फळबागांचे मोठे क्षेत्र वाढल्यामुळे पक्ष्यांना खाण्यायोग्य पिकांची वानवा आहे. त्या ठिकाणी अक्षरशः पिके राखणीला येण्यापूर्वीच पक्ष्यांच्या धाडी ज्वारीच्या पिकावर पडत असून दोनतीन दिवसांतच भरलेली कणसे मोकळी दिसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
हेही वाचा- मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी
नोकरी-धंद्याच्या निमित्त गावाकडील शहरात गेलेली मंडळी, आवर्जून नाताळच्या सुट्टीमध्ये हुरडा खाण्याच्या निमित्ताने गावाकडे येत असतात. हुरडा होण्यापूर्वीची ज्वारीच्या कणसांची फुलोऱ्यातील अवस्था ही अत्यंत नाजूक अवस्था समजली जाते. या अवस्थेमध्ये अवकाळी पाऊस झाला तर ज्वारी तांबडी पडते, काळी पडते. मात्र, आता वेगळ्याच संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. पक्ष्यांच्या धुंडीच्या धुंडी ही ज्वारीची पिके फुलोऱ्यात असतानाच नष्ट करत असल्याने आधीच पेरण्यामध्ये विस्कळीतपणा आलेल्या ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता जाणकाराकडून व्यक्त होत आहे.
राखणीपूर्वीच ज्वारीवर संकट
ज्वारीच्या पिकामध्ये सर्वांत जिकिरीचे आणि अवघड असे काम पक्ष्यांपासून ज्वारी वाचवण्याचे असते. ज्वारीच्या पिकाची राखण करण्यासाठी भल्या पहाटेपासूनच शेतकरी शेतावर गोफण, फटाके व अन्य प्रकारची आवाज काढण्याची साधने घेऊन आपल्या पिकांतून पक्ष्यांना हुसकावून लावण्याचे काम करत असतो. त्यासाठी ज्वारीच्या पिकात उंच लाकडी माळा केला जातो. या माळ्यावर उभा राहून पक्ष्यांना विशिष्ट प्रकारच्या हाका मारत वेगवेगळा आवाज करत त्यांना हुसकावले जाते. सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या मध्यावधीमध्ये ज्वारी राखणीला सुरुवात होते. त्यानंतर हुरडा पार्ट्या सुरू होतात. मात्र, यंदा राखणीची वेळ येण्यापूर्वीच फुलोऱ्यातच पक्ष्यांचे संकट शेतकऱ्यांपुढे ठाकले आहे.