‘नावात काय आहे’ असे जगप्रसिद्ध साहित्यिक-नाटककार शेक्सपिअरने म्हटले आहे. पण, नावातच सारे काही असते याची प्रचिती नागरिकांना दैनंदिन जीवनात सातत्याने येते. आपण धारण करीत असलेले नाव हे तेच आहे याची सरकार दरबारी नोंद असल्याचा जन्मदाखला हा एकमेव पुरावा ग्राह्य़ धरला जातो. या जन्मनोंदणी दाखल्यामध्ये नावाचा समावेश करण्यासाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे.
जन्मनोंदणी दाखल्यामध्ये नावाचा समावेश करण्यासाठीची मुदत शिथिल करण्यात आली आहे. दाखल्यामध्ये नावाची नोंद करण्याची यापूर्वीची मुदत ही १५ वर्षे होती. त्यामध्ये पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नावाशिवाय नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना या मुदतवाढीचा लाभ होऊ शकणार आहे. १ जानेवारी २००० पूर्वी मुलाच्या नावाशिवाय नोंदणी करणारे आणि नोंदणीला १५ वर्षे पूर्ण झालेल्या शहरातील सर्व नागरिकांना नावाची नोंद करता येणार आहे. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम आणि महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमानुसार जन्मतारखेपासून १५ वर्षांपर्यंत बाळाच्या नावाची जन्मदाखल्यात नोंद करता येऊ शकते. महापालिका हद्दीतील जानेवारी २००० पूर्वीच्या त्याचप्रमाणे १९६९ पूर्वीच्या नोंदणी केलेल्या नागरिकांना त्यांचे नाव जन्मदाखल्यामध्ये समाविष्ट करता येऊ शकेल. तरी नागरिकांनी जन्मदाखल्यामध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी महापालिकेच्या कसबा पेठ येथील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्यप्रमुख डॉ. ए. टी. परदेशी यांनी केले आहे.
…………….

Story img Loader