पुणे : शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावे दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. सराफी व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणारा इमेल पाठविण्यात आला असून, याप्रकरणाचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्यानंतर बिष्णोई टोळी पु्न्हा चर्चेत आली. बिष्णोई सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात आहे. त्याच्या टोळीच्या नावे दिल्ली, चंदीगडमधील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यात आल्याच्या घटना घडल्या.

हेही वाचा >>> बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप

सिद्दीकी खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत नऊ जणांना अटक केली. बिष्णोई टोळीच्या नावे शहरातील एका प्रसिद्ध सराफी पेढीला खंडणीसाठी धमकीचा इमेल पाठविण्यात आल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. त्यानंतर याबाबतची तक्रार गुन्हे शाखेकडे देण्यात आली. ‘लाॅरेन्स बिष्णोई टोळीला दहा कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास बाबा सिद्धीकीप्रमाणे अवस्था करु. खंडणीची रक्कम कधी आणि कशाप्रकारे द्यायची, याबाबतची माहिती दुसरा मेल पाठवून देऊ’, अशी धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> कात्रज भागात फिरायला जाणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल चोरणारे गजाआड

याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. खंडणीसाठी इमेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. इमेल पाठविणाऱ्याचा सायबर गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. पंजाबमधील गायक,काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची हत्या बिष्णोई टोळीने केली होती. त्यानंतर शहरातील एका व्यावसायिकाला बिष्णोई टोळीच्या नावे खंडणी मागण्यात आली होती. शहरातील सराफ व्यावसायिकाला धमकीचा इमेल पाठविणारा पुणे शहर परिसरातील असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पुण्यातील सराफी पेढीच्या देशभरात, तसेच परदेशातही शाखा आहेत.