पुणे : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांना मारहाण करण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आप्पा जाधव यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात येतोय. पुण्यातील भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल १४ मे रोजी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांच्यासह इतर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली होती. त्यानंतर आता आप्पा जाधव यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
हेही वाचा >> नवनीत राणा यांची अटक राजकीय होती का? मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनीच दिलं उत्तर; म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यानंतर पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी 14 मे रोजी शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गणेश नलावडे, दिपक पोकळे, रोहन पायगुडे, अजिंक्य पालकर, दीपक जगताप, संतोष जोशी, आप्पा जाधव, राजेंद्र अलमखाने, प्रसाद गावडे यांनी विनायक आंबेकर यांना पोस्टबद्दल जाब विचारण्यासाठी थेट त्यांचं ऑफिस गाठलं होतं. तसेच तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी आप्पा जाधव यांनी विनायक आंबेकर यांना मारहाण केली होती. त्यानंतर या प्रकरणी आप्पा जाधव यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.
हेही वाचा >> राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संजय राऊतांनी घेतली शरद पवार यांची भेट; म्हणाले ‘त्यांचे आशीर्वाद…’
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही मारहाण भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी आप्पा जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
हेही वाचा >>> “एखाद्याला मूलबाळ होत नसेल तर त्याला बोलवून हा बंड्या…”; संभाजीनगरवरुन सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्र्यावर टीका
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शहरात राजकीय आरोप प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पक्षीय शहराध्यक्ष यांची बैठक घेऊन शहरात शांतता आणि सलोखा कसा राहील यावर चर्चा केली होती. या बैठकीत सर्वांनी एकमत करून शहरात शांतता राहील अशी ग्वाही देण्यात आली होती. असे असताना आता शहरात राजकीय नेत्यामध्ये हा वाद पेटला आहे. .