पिंपरी : मावळमधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटला असल्याचे सांगितले जात असतानाच आता भाजपशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कामगारांच्या प्रतिनिधीला संधी देण्याची मागणी केली आहे. मावळ मतदारसंघ भाजपकडे घ्यावा आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीचा सुटण्याच्या मार्गावर असलेला तिढा पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात औद्योगिक पट्टा आहे. पिंपरी-चिंचवड, तळेगाव, उरण, पनवेल या भागात मोठे उद्योग असून कामगार वर्ग मोठा आहे. श्रमिकांना प्रतिनिधीत्व द्यावे. मावळची जागा भाजपने घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी करत भोसले म्हणाले, की राज्यात ६० ते ७० टक्के कामगार आहे. तो असंघटित आहे. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, आवाज उठविण्यासाठी श्रमिकांचा लोकसभेत प्रतिनिधी असावा, अशी कामगारांची भावना आहे.
हेही वाचा…पुणे : दिव्यांग मुलीची रॅगिंग; रॅगिंग सहन न झाल्याने ब्रेन स्ट्रोक!
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी, तळेगावदाभाडे, चिंचवड, उरण, पनवेलला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आहे. त्यामुळे मावळमध्ये कामगार वर्ग मोठा असून कामगार क्षेत्रातील एकाला कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी. महायुतीत अनेक ठिकाणी मतदारसंघाची अदला-बदल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मावळातही बदल करावा. हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून मला उमेदवारी द्यावी. कामगारांच्या प्रतिनिधीला मतदारसंघ दिल्यास राज्यात, देशात भाजपबाबत कामगारांमध्ये सहानुभूती, चांगल्या भावना निर्माण होतील. श्रमिकांची दखल घेतली जाईल. याचा महायुतीला राज्यभरात फायदा होईल. कामगार वर्ग महायुतीच्या पाठिशी उभा राहील, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…पुणे : कालव्यात बुडालेला शाळकरी मुलगा मृतावस्थेत सापडला
उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कोलकोटे, एसकेएफचे स्वानंद पाचपाठक, हॉटेल व्यावसायिकांचे प्रतिनिधी दिपक पाटील, विद्यार्थी व युवा संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील, विठ्ठल ओझरकर, नितीन कांबळे, बापुसाहेब वाघेरे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.