पिंपरीसह भोसरी विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, त्या दोन्ही जागा आम्ही निवडून आणू, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यामुळे या विषयावरून भाजप-सेनेतील थंडावलेला संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभेच्या जागांपैकी पिंपरी राखीव मतदारसंघ भाजपकडे असून चिंचवड व भोसरी सेनेकडे आहे. तथापि, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार भोसरी मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी प्रचंड आग्रही आहेत. त्याच हेतूने भोसरीत प्रदेशाध्यक्षांसमोर त्यांनी रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मोठय़ा संख्येने जमलेल्या समर्थकांसमोर बोलताना त्यांनी भोसरी मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी केली. शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनीही तो मुद्दा लावून धरला. पिंपरीसह भोसरी भाजपला द्या, आम्ही दोन्ही निवडून आणू, असे ते म्हणाले. तथापि, फडणवीस यांनी सध्या लोकसभा हे पहिले लक्ष्य असून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. लोकसभेनंतरच या मागणीचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.
सध्याच्या जागावाटपात कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र, भाजपकडे असलेल्या पिंपरीसाठी शिवसेनेच्या सीमा सावळे तर शिवसेनेकडे असलेल्या भोसरीसाठी भाजपचे एकनाथ पवार जोरदार फिल्डिंग लावून बसले आहेत. भोसरीसाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जाते. त्यांच्या नावाला विरोध झालाच तर जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, भोसरीचे शहरप्रमुख विजय फुगे यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. भोसरी भाजपच्या वाटणीला येणे अवघड आहे. मात्र, तो मिळालाच तर एकनाथ पवार यांच्यासह शेखर लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, आशा लांडगे यांची नावे स्पर्धेत राहतील. गेल्या काही दिवसांपासून भाजप वर्तुळात भोसरी-पिंपरीवरून बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. त्यावरून यापूर्वी बराच संघर्ष झालेला आहे. आता पुन्हा तोच प्रकार होऊ नये म्हणून लोकसभेनंतर पाहू, असे प्रदेशाध्यक्षांनीच स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा