महायुतीतील जागावाटपाचा कसलाही ठावठिकाणा नसताना भोसरी मतदारसंघ आपल्यालाच मिळणार, अशा थाटात गुप्त व्यूहरचना करायला निघालेल्या काही अतिउत्साही नेत्यांमुळे पिंपरी भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. भोसरीवरून शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुंपल्याचा संघर्ष ताजा असतानाच त्यात भाजप विरुद्ध भाजप असे दुफळीचे चित्र पुढे आले आहे.
लोकसभेतील दणदणीत यशानंतर जागा वाढवून घेण्यासाठी भाजपची चढाओढ सुरू आहे, त्याचाच प्रत्यय पिंपरी-चिंचवडमध्ये येतो आहे. शिवसेनेकडील हक्काची भोसरी मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी, यासाठी माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांचा प्रचंड आटापिटा सुरू आहे. त्यासाठी पवारांचे वेगवेगळे डावपेच आणि कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. अलीकडे तर भोसरी भाजपलाच मिळणारच, या थाटात त्यांचे नियोजन सुरू आहे. याकामी ‘व्यूहरचने’साठी पवारांचे जुने ‘लाभार्थी’ असलेले निरीक्षक कम नेते हद्दीची मर्यादा ओलांडून त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. या द्वयीने चिंचवड रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये भोसरी विधानसभेच्या तयारीसाठी गुप्त बैठक घेतली. मात्र, भोसरीतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व उमेदवारीसाठी दावेदार असलेल्या मंडळींना पूर्णपणे अंधारात ठेवले. एवढेच नव्हे तर शहराध्यक्षांनाही कळवण्याची तसदी घेतली नाही. या गुप्त व्यूहरचनेच्या प्रकारामुळे ‘भोसरीकर’ कार्यकर्ते संतापले आहेत. त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी पवार व भोसरीकरांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता, तो प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला होता. तेव्हा दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, परिस्थितीत सुधारणा होण्याऐवजी आणखी बिघाड झाल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे संघटनमंत्री व प्रदेश सरचिटणिसांनी तीनही मतदारसंघांचा एकत्रित आढावा पक्षकार्यालयात घेतला असताना पुन्हा फक्त भोसरीची स्वतंत्र व एकाच गटापुरती मर्यादित बैठक का घेण्यात आली, शहराध्यक्षांना विश्वासात का घेतले नाही, असा मुद्दा उपस्थित करत भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गुप्त व्यूहरचनेच्या नादात, भाजप नेते वादात
या गुप्त व्यूहरचनेच्या प्रकारामुळे ‘भोसरीकर’ कार्यकर्ते संतापले आहेत. त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी पवार व भोसरीकरांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता.
First published on: 04-08-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp bhosari hide meeting