पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमंत रासने यांनी शाळेत प्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यावरून विरोधकांनी भाजपला कोंडीत पकडण्यास सुरूवात केल्यानंतर भाजपकडूनही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा शाळा परिसरातील प्रचाराची चल चित्रफीत प्रसारित आली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार थेट शाळांपर्यंत पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले असून पालक वर्गाकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पोटनिवडणूक न लढवण्याचा आम आदमी पक्षाचा निर्णय; कसबा पोटनिवडणूकीतून माघार
भाजपचे कसबा विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने यांनी गुरूवारी प्रचारार्थ पदयात्रा काढली. पदयात्रेवेळी सकाळ सत्राची शाळा सुटली होती आणि दुपार सत्राची शाळा सुरू होण्याची वेळ झाली होती. त्यामुळे पालकांची मुलांना ने-आण करायची गडबड सुरू होती. रासने यांचा प्रचार ताफा शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पोहोचला. प्रचार यात्रेतील उपस्थित कार्यकर्त्यांनी शाळेतच प्रचार पत्रकांचे वाटप केले. हेमंत रासने यांनी मत देण्याचे आवाहन पालक वर्गाला केले. त्याबाबात पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शाळेत प्रचार कसा करता अशी विचारणा करत सुनावले.
हेमंत रासने यांचा हा प्रकार समजल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर भाजपने ही शाळा परिसरातील रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार फेरीची चल चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित केली आहे.
महाविकास आघाडीने असंस्कृतपणा आणि नियमांचे उल्लंघन करत रमणबाग शाळेत प्रचार केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते आणि पदाधिका-यांकडून करण्यात आला आहे.