पिंपरी : लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांनी महायुतीविरोधात भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाची गरज नाही. शहरातील तिन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार,’ असे लांडे यांनी सांगितले. लांडे यांची ही भूमिका, हा अजित पवार यांना धक्का मानला जात असून, भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या अडचणींत त्यामुळे भर पडली आहे.

तत्कालीन हवेली मतदारसंघ आणि भोसरी मतदारसंघाचे विधिमंडळात प्रतिनिधित्व केलेले विलास लांडे यांना गेल्या सलग दोन निवडणुकांत भोसरीतून पराभव पत्करावा लागला होता. भाजपचे महेश लांडगे यांनी त्यांना पराभूत केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर लांडे यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले. त्यांनी लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी मागितली होती. परंतु, पवार यांनी लांडे यांची मागणी फेटाळली. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी दिली गेली. तेव्हापासून लांडे नाराज होते.

हेही वाचा >>> “माणसं उभा करणार्‍याला विकास म्हणायचं की इमारती उभा करणार्‍याला विकास म्हणायचं?” खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी अलीकडच्या काळात वारंवार भेट घेण्यास सुरुवात केली. त्यांचे नातलग असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेतला असून, ते आमच्यासोबत असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले होते. मात्र, लांडे यांनी सावध भूमिका घेऊन अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे लांडे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस त्यांची भूमिका समोर आली आहे. महाविकास आघाडीचे शहरातील उमेदवार ठरविण्यात लांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली आहे.

हेही वाचा >>> चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगतापांनी भरला उमेदवारी अर्ज; राहुल कलाटेंवर केली टीका..

‘अजित गव्हाणे यांना मीच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात पाठविले होते. मला प्रवेश करण्याची आवश्यकता नाही. मी शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता आहे. पवार यांनी माझ्याकडे पुणे जिल्ह्याची दिलेली जबाबदारी मी पार पाडणार आहे. उमेदवार ठरविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील महाविकास आघाडीकडून लढत असलेले राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मागच्या पराभवांचे उट्टे काढून भोसरीला दहशतमुक्त, दादागिरीमुक्त करणार आहे,’ असे लांडे म्हणाले. गेल्या दहा वर्षांत भोसरीत बकालपणा, दहशतवाद, दादागिरी वाढली आहे. हे मोडीत काढायचे आहे, असेही ते म्हणाले.