राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मंगळवारी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकातं पाटील यांनी माझं तिकीट कापलं असं म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत ते तिकीट आणि व्होट बँक पक्षाची असते असं म्हटलं. तसंच ही व्होट बँक वर्षानुवर्षे मेहनत घेत विकसित करण्यात आलेली असल्याचं सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला,” असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले –

“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

अमोल मिटकरींची टीका –

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. “कोणीही या वक्तव्याचं समर्थन करु शकत नाही. चंद्रकांत पाटील यांना इतिहासाची किती माहिती आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू समाजापुरतं मर्यादित ठेवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही महाराज हिंदूंची व्होट बँक वाटतात, त्यामुळे भाजपाला वाटणंही स्वाभाविक आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

“महाराजांनी स्थापन केलेलं राज्य हिंदूंचं राज्य नव्हतं, हे रयतेचं लोककल्याणकारी राज्य होतं. त्यात मुस्लीसुद्धा होते. चंद्रकांत पाटील यांना एवढं माहिती असायला हवं. पण आता राजकारणासाठी महाराजांचा सोयीनुसार वापर केला जात आहे. मागील काळात योगींची, मोदींची तुलना महाराजांशी करण्यात आली होती,” अशी आठवण करुन देत त्यांनी संताप व्यक्त केला.

“हे बालिशपणाचं वक्तव्य आहे. उतारवयात बुद्धी नाठी होते असं म्हणतात. हे वक्तव्य म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. या वक्तव्याची चर्चा फक्त महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नाही तर अनेक शिवप्रेमी दुखावले आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. त्यांनी महाराजांची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil chhatrapati shivaji maharaj hindu vote bank atal bihari vajpayee narendra modi sgy