केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या सहकार विभागावरून देशात बरीच चर्चा सुरू आहे. पण त्याहून जास्त चर्चा ही त्या सहकार खात्याचा कारभार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेल्याची सुरू आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार खातं देऊन महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार कारखान्यांना शह देण्याची मोदींची योजना असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सहकार खात्यावरून केंद्र सरकारवर टीका केली असताना त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. संजय राऊतांना सहकारमधलं का कळतं? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राऊतांनी आधी अभ्यास करावा आणि मग…
केंद्राकडे सहकार विभाग जाणं हा लोकशाहीला धोका असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. “माझा संजय राऊतांना एक प्रश्न आहे की, त्यांना सहकारामधील काय कळतं? एक सहकारी साखर कारखाना किती शेयर होल्डरवर तयार होतो? त्याचा प्रमुख काय काय काम करू शकतो? त्याबाबत मोठी यादी आहे. त्याबद्दल त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मग त्यांनी बोलावं”, असं पाटील यावेळी म्हणाले आहेत.
“सूडबुद्धीने केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर होतोय”; शिवसेना खासदार संजय राऊत यांचं टीकास्त्र
“सहकार कशाशी खातात, हे त्यांना माहिती नाही”
दरम्यान, मोदींनी सहकार क्षेत्र वाचवल्याचं ते यावेळी म्हणाले. “सहकार कशाशी खातात हे त्यांना माहिती नाही. त्यांनी सहकारबद्दल कशाला बोलावं? मोदींनी सहकार क्षेत्र वाचवलं. साखरेचा किमान हमीभाव ठरवून दिला. इथेनॉलची टक्केवारी वाढवली. मोठी यादी आहे. सहकार क्षेत्राला आणखी काय देता येईल, हे बघण्यासाठी सहकार खातं निर्माण झालेलं आहे. कदाचित हे खातं अमित शाहांऐवजी अजून कुणाकडे गेलं असतं तर एवढी भिती वाटली नसती. अमित शाहांकडे गेल्यामुळे त्यांना जास्त भिती वाटते”, असं पाटील म्हणाले आहेत.