विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते असा आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनामधून केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील देहूत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
Rajya Sabha: भाजपा जिंकला, पण तो विजय खरा आहे काय?; सामना ‘रोखठोक’मधून संजय राऊतांची विचारणा
चंद्रकांत पाटील यांना संजय राऊतांच्या या टीकेसंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “पंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजपा समर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील त्या लेक आहेत. त्यामुळे त्यांची काळजी करण्याची वेळ आलेली नाही. आम्ही समर्थ आहोत”.
Maharashtra Breaking News Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
स्वागत फलकावर विठ्ठलापेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्यासंबंधी विचारलं असता त्यांनी राष्ट्रवादीने तसे फलक लावून त्यावर पांडुरंगाचा फोटो मोठा लावावा, मोदींचा लहान लावावा किंवा लावू नये असं उत्तर दिलं. काही कार्यकर्ते उत्साहात असे फलक लावतात असंही ते म्हणाले.
भाजपानं रडीचा डाव खेळला असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केल्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “नाचता येईना अंगण वाकडं. यांना अगोदरच पराभव दिसला होता. तशी त्यांनी अगोदर पराभवाची स्क्रिप्ट लिहून ठेवली होती. पराभव झाल्यानंतर सर्व त्या स्क्रिप्टवर बोलत आहेत. भांडणं आपापसात असली तरी एक वाक्य सगळे बोलत असतात, याला इको सिस्टम म्हणतात. यांची इको सिस्टम चांगली आहे. आम्हाला त्याची गरज नाही”.