पुणे : शहरातील मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेताना हेल्मेट परिधान न करता वाहतूक पोलिसांच्या दुचाकीवरून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेला प्रवास वादग्रस्त ठरला. ज्या पोलिसाच्या वाहनावरून त्यांनी भेटी दिल्या, त्या पोलिसानेही हेल्मेट परिधान केले नसल्याचे दिसून आले. यामुळे समाजमाध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली.
मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ आणि भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या गणपतींची स्थापना झाल्यानंतर या सर्व गणपतींचे दर्शन चंद्रकांत पाटील यांनी घेतले. गणेशोत्सवामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. तसेच काही भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता. मंत्री असल्याने गाड्यांचा ताफा, त्यातून होणारी वाहतूक कोंडी तसेच गणेशोत्सवामुळे मध्यवर्ती भागात झालेली गर्दी, मिरवणुका यामुळे गणपतींचे दर्शन घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी एका वाहतूक पोलिसाच्या दुचाकीवरून प्रवास केला. त्याबाबतची छायाचित्रे समाजमाध्यमातून वेगाने प्रसारित झाली. दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. मात्र वाहतूक पोलीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील या दोघांनीही हेल्मेट परिधान न केल्याने समाजमाध्यमातून पाटील यांच्यावर टीका करण्यात आली.