Chandrakant Patil Win : पुणे : भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात बालेकिल्ल्याला साजेसे मताधिक्य घेत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील एकतर्फी लढतीमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळविला. एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ‘बाहेरचा’ उमेदवार हा शिक्काही पुसण्यात त्यांना यश आले आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मतदान पाटील यांना कोथरूडमधून या निवडणुकीत झाले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची प्रतिष्ठाही राखली गेली आहे.
कोथरूड मतदारसंघामध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेकडून ॲड. किशोर शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते. सन २०१४ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने खरी लढत भाजप-शिवसेनेत होईल आणि त्यामध्ये मनसेची मते निर्णायक ठरतील, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, लढत एकतर्फीच झाली. पाटील यांना १ लाख ५९ हजार २३४ मते मिळाली तर, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोकाटे यांची मते ४७ हजार १९३ पर्यंत मर्यादित राहिली. शिंदे यांना १८ हजार १०५ मते मिळाली. सन २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांना पंचवीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी पाटील हे कोथरूड बाहेरचे उमेदवार असल्याचा मुद्दा चर्चेचा ठरला होता.
हेही वाचा…Khadakwasla Vidhan Sabha Result : खडकवासल्यात मनसेची मते निर्णायक
केंद्रीय सहकारमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या खासदार प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर या मतदारसंघातील असल्याने पाटील यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, पाटील यांचे मताधिक्य १ लाख १२ हजार ४१ पर्यंत पोहोचल्याने नेत्यांची प्रतिष्ठाही राखली गेली आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारंसघातून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७४ हजार ४०० मताधिक्य मिळाले होते.
हेही वाचा…Pune Cantonement Vidhan sabha पुणे :’लाडक्या बहिणींमुळे…’ सुनील कांबळे काय म्हणाले ?
ठळक वैशिष्ट्ये
-पारंपरिक मतदारांकडून पाटील यांना पसंती
-महायुतीतील राष्ट्रवादी, शिवसेनेची ताकद
-लोकसभेपेक्षा कोथरूडमधून जास्त मताधिक्य
-लक्षवेधी ठरणारी लढत एकतर्फी
पाच वर्षे कोथरूडकरांची प्रामाणिक सेवा केली. प्रत्येक कुटुंबाशी जोडला गेलो. हा विजय कोथरूडमधील प्रत्येक नागरिकाचा आहे. पुन्हा जोमाने जनतेची सेवा करेन. – चंद्रकांत पाटील, विजयी उमेदवार