पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या मावळ विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. दोन ऑगस्ट रोजी मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे आमदार शेळके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून एकत्रित विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ’ असे महायुतीचे प्राथमिक सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. परंतु, घटक पक्षाचा आमदार असलेल्या मावळ मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. ही जागा कमळाच्या चिन्हावर लढविण्यासाठी आग्रह धरला आहे. यासाठी दोन ऑगस्टला मावळ भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सलग २५ वर्षांपासून मावळातून भाजपचा आमदार निवडून येत होता. परंतु, २०१९ मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. पक्षाने बाळा भेगडे यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे तत्कालीन नगरसेवक असलेल्या सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेळके यांनी राज्यमंत्री असलेले भेगडे यांचा ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
हेही वाचा – “ते नसतानाही पुण्यात धरण वाहिलं”; पूरस्थितीवरुन राज ठाकरेंची अजित पवारांवर टीका
मागील पाच वर्षांत आमदार शेळके आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये विविध कारणांनी खटके उडत राहिले. एका व्यासपीठावर येणेही टाळत होते. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत आल्यानंतरही त्यांच्यातील राजकीय मतभेद कमी झाल्याचे दिसले नाही. त्यातच आता भाजपने मावळ मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात मावळ भाजप आणि आमदार शेळके यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. आमदार शेळके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटण्याची आणि आमदार शेळके यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना आता भाजपने दावा केला आहे. त्यामुळे मावळवरुन महायुतीत तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दोन ऑगस्टला मेळावा होणार आहे.
हेही वाचा – पिंपरी : म्हाळुंगे एमआयडीसीत एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करुन तरुणीचा खून
माजी आमदार बाळा भेगडे म्हणाले, की रामभाऊ म्हाळगी यांनी १९५७ ला जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. १९५७ ते २०२४ या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपचे आमदार मावळच्या जनतेने निवडून दिले आहेत. संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा मतदारसंघ म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. त्यामुळे परंपरागत बालेकिल्ला असलेला मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत. कमळ चिन्ह हाच आमचा चेहरा असेल.