पिंपरी : भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार असलेल्या मावळ, पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी चिंचवडसह मावळ, पिंपरीत भाजपचा आमदार असला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिले. मावळमध्ये अजित पवार गटाचे सुनील शेळके, पिंपरीत अण्णा बनसोडे आमदार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविजय २०२४ अंतर्गत मावळ लोकसभा प्रवास दौरा, घर चलो अभियानाअंतर्गत बावनकुळे यांनी पिंपरी,चिंचवड, मावळ विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सला बुधवारी काळेवाडीत मार्गदर्शन केले. महासचिव मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, विलास मडिगेरी, सदाशिव खाडे, अमित गोरखे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पिंपरीतील फौजदार ऑनलाइन जुगारातून झाला कोट्यधीश; पण जुगार खेळणे येणार अंगलट

बावनकुळे म्हणाले, आतापर्यंत आपण राज्यात पूर्ण बहुमताने सत्तेत कधीच आलो नाहीत. १२४ च्या पुढे आमदारांची संख्या गेली नाही. गुजरात, राजस्थानमध्ये पूर्ण बहुमताने भाजप सत्तेत येते. महाराष्ट्रात एकहाती सत्ता येत नाही, याची खंत वाटते. यावर्षीचा महाविजय करण्यासाठी झपाटून काम करा. यावेळेस महाविजय झाल्यास पुढील १५ वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल. १५ वर्षे भाजप सत्तेतून हटणार नाही. महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत.

त्यासाठी मावळ, पिंपरी, चिंचवड मतदारसंघातील तिन्ही आमदार कमळाच्या चिन्हावर ५१ टक्के मते घेऊन विजयी झाले पाहिजेत. मावळचा खासदार महायुतीचा होईल. उमेदवार तिन्ही पक्षाचे नेते ठरवतील. बारामती लोकसभा मतदारसंघ महायुती ५१ टक्के मते घेऊन १०० टक्के जिंकेल. लोकसभा निवडणूक जवळ येताच इंडिया आघाडीत असंतोष निर्माण होईल. मोठी ठिणगी पडेल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात पुढील १५ वर्षे भाजपची…

राहुल गांधी २०४७ पर्यंत पंतप्रधान होऊ शकत नाहीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीच राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत असे म्हटले आहे. त्यामुळे २०४७ पर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत. आपल्याकडे नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अशी किती लांब रांग आहे, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp claims on pimpri maval assembly seats after chandrashekhar bawankule instruction to party workers pune print news ggy 03 zws