एखाद्या नेत्याच्या नावाने दुसऱ्या पक्षाकडून मते मागितली गेली, तर काय कारवाई करायची याबाबत निवडणूक आचारसंहितेत तरतूद नसल्यामुळे आचारसंहितेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली असून या मागणीसाठी भाजपतर्फे याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. 
भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रचार व्यवस्थापन समितीचे प्रमुख श्रीकांत भारतीय यांनी ही माहिती दिली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मते मागण्यात आल्यानंतर भारतीय यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनीही मोदी मतदारांना जी पत्रके वाटली त्यावर मोदी यांचे छायाचित्र छापले होते. त्याबाबतही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एखाद्या राजकीय नेत्याच्या नावाचा वा प्रतिमेचा वापर अन्य राजकीय पक्षांकडून होत असल्याचा प्रकार प्रथमच घडत असल्यामुळे अशा घटनेत काय कारवाई करायची याबाबत आचारसंहितेत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे आचारसंहितेतच तातडीने सुधारणा व्हावी, अशी मागणी आम्ही करत आहोत, असे भारतीय यांनी सांगितले. त्यासाठी भाजपतर्फे याचिका दाखल केली जाणार आहे.
मोदीजी की दो आँखे; पक्षाचे नवे अ‍ॅप
पक्षाचे कार्यकर्ते किती घरी संपर्क साधतात आणि किती मतदारांना मतदानाच्या स्लिप वाटतात, याचा ताळेबंद घेणारे नवे अँड्रॉइड अ‍ॅप भाजपने विकसित केले असून त्याला ‘मोदीजी की दो आँखे’ असे नाव देण्यात आले आहे. हे अ‍ॅप कार्यकर्त्यांच्या स्मार्ट फोनवर लोड करण्यात येत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि बूथ प्रमुखांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क करावा तसेच मतदारांना स्लिपा नेऊन द्याव्यात, अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. कार्यकर्ते ज्या घरी जातील, त्या घरातील मतदारांना ते या अ‍ॅपवरूनच मतदानाची स्लिप देतील आणि घरातील एका व्यक्तीचा मोबाइल क्रमांक घेतील. हा क्रमांक अ‍ॅपमध्ये स्टोअर केल्यानंतर तो पक्षाच्या निवडणूक वॉररूममध्ये रेकॉर्ड करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे कार्यकर्ता प्रत्यक्षात किती घरी गेला याचा आढावा घेणारी व बूथ सक्षम करणारी अशी ही यंत्रणा असल्याचे श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.

Story img Loader