माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपमध्ये जाणाऱ्यांना ‘कुंडली’ बाहेर काढण्याची धमकी दिल्याचे विधान ताजे असतानाच त्यांनी पुन्हा भाजपवरच तोडपाणीचा आरोप केला आहे. अजित पवार विरुद्ध भाजप असा सामना सध्या रंगला आहे. राष्ट्रवादी हा समान शत्रू असतानाही शिवसेना व भाजपचे तोंड परस्परविरोधी आहे. युती करून बलाढय़ राष्ट्रवादीला सत्तेबाहेर घालवायचे की कुरघोडीच्या राजकारणातून आपापसात लढायचे, यावरच युतीचे भवितव्य राहणार आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं युती न झाल्यास पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता प्रस्थापित होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरजच नाही.
िपपरी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आणि अनेकांनी भारतीय जनता पक्षाची वाट धरली, त्या सर्वाना उद्देशून अजित पवार एकदा म्हणाले, एकेकाची कुंडलीच बाहेर काढतो. भाजपकडून सातत्याने राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले, तेव्हा त्यांनी, आमच्यावर आरोप करणारेच तोडपाणी करतात, असा प्रत्यारोप केला. वरच्या राजकारणात काँग्रेसला मातीत घालण्याचा समान हेतू ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीत अंतस्थ हातमिळवणी असली, तरी िपपरी-चिंचवडच्या राजकारणात मात्र अजित पवार व भाजप यांच्यातच मुख्य सामना होणार आहे आणि त्याची रंगीत तालीम सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीचे एके काळचे ‘सुभेदार’ आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडेच शहर भाजपच्या नेतृत्वाची धुरा आहे. त्यांनी राष्ट्रवादीला अचानक सोडचिठ्ठी दिली, त्याचा जबर धक्का पवारांना बसला होता व त्यामुळेच जगतापांवर राग काढण्याची कोणतीही संधी पवार सोडत नाहीत. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे देखील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्याने त्यांच्या रागात भरच पडली. म्हणूनच भाजपमध्ये जाणाऱ्यांची थेट कुंडली काढण्याची धमकीची भाषा पवारांनी केली. यावरून आगामी काळात िपपरीचे कारभारी अजित पवार यांचे विरोधकांच्या बाबतीत आक्रमक धोरण राहणार, याचे स्पष्ट संकेत मिळू शकतात.
शिवसेना नेते म्हणतात, आम्ही भाजपशी युती करणार आहोत. मात्र, गाफील राहणार नाही. सर्व १२८ जागांसाठी उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवू. दुसरीकडे भाजपवाले म्हणतात, आम्ही महायुतीसाठी सकारात्मक आहोत. मात्र, सर्व प्रभागातील इच्छुकांचे अर्ज त्यांनी मागवून ठेवले आहेत. आपल्याचा पक्षाचा महापौर, स्थायी समितीचा अध्यक्ष होईल, अशी स्वप्ने दोन्हीकडील नेत्यांना पडतात. मात्र, एकटय़ाच्या जीवावर सत्ता आणण्याची ताकद दोघांत नाही. मुंबईचे राजकारण असो की िपपरीचे, भाजप-शिवसेनेचा मुळातच एकमेकांवर विश्वास नाही. विधानसभा निवडणुकीत २५ वर्षांची युती एका झटक्यात तोडण्यात आली. तो अनुभव पाठिशी असल्याने वरवर युती आणि मनात मात्र एकमेकांना मातीत घालण्याचे डावपेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवारांची जहागिरी असलेली ‘श्रीमंत’ िपपरी पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप-शिवसेनेला पवारांशी थेट सामना करावा लागणार आहे. मात्र, युती म्हणून तसे कोणतेही नियोजन, व्यूहरचना दिसून येत नाही. हा सामना अजित पवार विरुद्ध युती असा होणार की भाजप-शिवसेनेतच घमासान होणार, अशी शंका घेण्यासही जागा आहे. भाजपकडून राष्ट्रवादीला तसेच अजित पवारांना लक्ष्य केले जात असताना शिवसेनेकडून अजित पवारांशी पंगा न घेण्याची भूमिकाच दिसून येते. त्याचपद्धतीने, अजित पवारही शिवसेनेला अंगावर न घेता भाजपवर तुटून पडताना दिसतात. अजित पवारांची कुंडली आणि तोडपाणीची टीकात्मक भाषा फक्त भाजपला उद्देशून आहे, शिवसेनेला नाही. शहरातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याव्यतिरिक्त त्यांना पक्षाशी फारसे काही घेणं-देणं नाही, हे उघड गुपित आहे.
गेल्या १० वर्षांत सत्तेच्या माध्यमातून केलेला शहरविकास या एकाच मुद्दय़ावर निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. तर, विकासाच्या नावाखाली झालेला प्रचंड भ्रष्टाचार हा विरोधकांचा मुख्य मुद्दा राहणार आहे. राष्ट्रवादीला सत्तेबाहेर घालवायचे, याविषयी सर्वाचे एकमत आहे. मात्र, त्या दृष्टीने आवश्यक असलेली एकजूट विरोधकांमध्ये नाही. अनेक विरोधी नेते अजित पवारांच्या खिशात आहेत. राष्ट्रवादीला िखडार पाडून भाजपचा किल्ला उभारणीचे काम सध्या सुरू आहे. तर, तो खड्डा भरून काढण्यासाठी काँग्रेसला भगदाड पाडण्याची व्यूहरचना पवारांनी करून ठेवली आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते राहुल भोसले असे अनेक जण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. िपपरी, भोसरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी पराभूत झाली. बालेकिल्ला असताना असा विपरीत निकाल लागल्याचा धक्का पवारांना बसला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे तीनही मतदारसंघ राष्ट्रवादीला परत मिळवायचे आहेत. त्या दृष्टीने आगामी महापालिका निवडणुकीद्वारे त्यांची व्यूहरचना असणार आहे. त्यासाठी पूर्ण ताकदीने निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीत राष्ट्रवादी आहे. प्रभागांची रचना करताना भाजपप्रमाणे राष्ट्रवादीनेही आपल्या सोयीचे प्रभाग करून घेतले, त्याचा फायदा जसा भाजपला होणार, तसाच तो राष्ट्रवादीलाही होणार आहे. विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्याचे राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार आहे. चिंचवड-मोहननगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना समोरासमोर लढले, तेव्हा राष्ट्रवादी विजयी ठरली. िपपरीतील पोटनिवडणुकीत भाजप-रिपाइं आणि शिवसेनेचे उमेदवार भिडले, तिथे राष्ट्रवादीचा विजय झाला. असा पूर्वानुभव आणि एकूणच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता युती करून राष्ट्रवादीशी सामना करायचा की युतीतच दोस्तीत कुस्ती करत ‘आमने-सामने’चा खेळ करायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.