बनावट कागदपत्र प्रकरणी जामिनावर असलेले भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर फलक टाकून आंदोलन केले. शहरात अनाधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट असून पालिका याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप कामठे यांनी केला. याचा पुरावा म्हणून दोन टेम्पो भरून आणलेले अनधिकृत फलक त्यांनी पालिका प्रवेशद्वारासमोर टाकले.
पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपला कामठे यांनी या आंदोलनातून घरचा आहेर दिला आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना शैक्षणिक बनावट कागदपत्रं सादर केल्याप्रकरणी कामठे यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यात सांगवी पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे नगरसेवकांनी पालिकेसमोर आंदोलन केले होते. त्यांच्यावर पालिका प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आता भाजपच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल होणार का? हे पाहणं ही महत्वाचे आहे.
पिंपळे निलख येथील भाजपचे नगर सेवक तुषार कामठे यांच्याविरोधात महानगर पालिकेची निवडणूक ही शैक्षणिक बनावट कागद सादर करून लढवली असल्याच निष्पन्न झाले होते. काँग्रेसचे सचिन साठे यांनी सांगवी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली होती. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता सदर १२ वी पासचा दाखला हा बनवट असल्याचे निष्पन्न झाले होते. तुषार कामठे हे पिंपळे निलख येथील प्रभाग क्रमांक २६ (ब) येथून निवडणुकीला उभे राहिले होते त्यांच्या विरोधात काँग्रेस चे सचिन साठे हे विरोधक होते. मात्र, तुषार कामठे यांनी साठे यांचा मतांच्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली होती.