नेते तगडय़ा उमेदवाराच्या शोधात; भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक

नव्याने अस्तित्वात आलेल्या आणि व्याप्ती वाढलेल्या कोथरूड डेपो-बावधन या प्रभाग क्रमांक दहामध्ये इच्छुकांची मोठी संख्या असली, तरी सर्वच पक्षांपुढे उमेदवार कोण हा प्रश्न आहे. भाजपसह सर्वच पक्ष या प्रभागात तगडय़ा उमेदवाराच्या शोधात आहेत. राजकीय समीकरणे लक्षात घेऊन पत्नीला उमेदवारी द्यायची की स्वत:च निवडणूकलढवायची याचेही आडाखे बांधण्यास इच्छुकांकडून सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची सर्वाधिक संख्या असली, तरी बालेकिल्ला राखण्यासाठी अद्याप चाचपणीच सुरू असल्याचे चित्र आहे.

महापालिकेची निवडणूक यंदा प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघात कोथरूड डेपो-बावधन हा प्रभाग नव्याने तयार झाला आहे. कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला. शिवसेनेचीही येथे ताकद आहे. त्यामुळे शहराच्या अन्य भागांच्या तुलनेत या प्रभागातून निवडणूक लढविण्यास भाजपमधील इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या परिसरातील काही कार्यकर्त्यांनी उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. नव्याने अस्तित्वात आलेला हा प्रभाग उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोकांचा आहे. अनेक मोठमोठय़ा सोसायटय़ा आणि गृहप्रकल्प येथे आहेत. त्यामुळे तगडय़ा उमेदवाराचे आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे. हीच बाब लक्षात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात स्वत: उतरायचे की पत्नीला उमेदवारी द्यायची, यावर सध्या भाजपवगळता अन्य पक्षात खल सुरू आहे. विशेषत: मनसेमध्ये हाच पेच निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये आयात उमेदवार तयार आहेत. निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी सध्या रस्सीखेच सुरू असतानाच आणखीही काही जण भाजपच्या उंबरठय़ावर आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी या इच्छुकांकडून थेट प्रदेशाध्यक्षांपर्यंत लॉबिंग सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यात मनसेच्याही काही कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थताही निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र बालेकिल्ला राखण्यासाठी तगडय़ा उमेदवाराच्या शोधात भाजप असल्याचे चित्र सध्या तरी या प्रभागात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विद्यमान नगरसेवक शंकर केमसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अन्य तीन उमेदवार कोण, याचीच चाचपणी प्रभागात सुरू आहे. त्या बरोबरच मनसेतून भाजपमध्ये आलेले नगरसेवक  राजाभाऊ गोरडे, राष्ट्रवादीचे शंकर केमसे आणि मनसेचे गटनेता किशोर शिंदे यांना या प्रभागात लढावे लागणार असून परस्परांच्या विरोधात उभे राहण्यापेक्षा वेगवेगळ्या जागांवर लढण्याची व्यूहरचना त्यांच्याकडून लढवली जात असल्याची चर्चा आहे.

Story img Loader