पुणे : मतदारांना गृहीत धरणे, अति आत्मविश्वास, लादण्यात आलेला उमेदवार, त्यातून निर्माण झालेली नाराजी, निवडणुकीत अवलंबलेली साम, दाम, दंड, रणनीती, मतदारांना दाखविण्यात आलेली प्रलोभने, वैयक्तिक जनसंपर्काचा अभाव आदी कारणांमुळे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. प्रचारात जुन्या जाणत्यांना डावलल्याची किंमतही भाजपला मोजावी लागली.
चिंचवडमध्ये ‘मविआ’तील बंडखोरीने तारले
पिंपरी : चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयी उमेदवार अश्विनी जगताप यांचे मताधिक्य आणि बंडखोर राहुल कलाटे यांना मिळालेली एकूण मते पाहता भाजपला महाविकास आघाडीतील बंडखोरीने तारल्याचे स्पष्ट होते. २०१९ च्या निवडणुकीत उमेदवारही देऊ न शकलेल्या राष्ट्रवादीने कडवी झुंज दिली. मात्र, बंडखोरीमुळे विजयाला गवसणी घालता आली नाही. ‘मविआ’तील या बंडखोरीमुळे भाजपने चिंचवडचा गड राखला.
मुंबईत काँग्रेसचा जल्लोष
मुंबई : कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रिवद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे. इतकेच नव्हेतर, दहशत निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचे भाजपचे मनसुबे कसब्यातील मतदारांनी उधळून लावले आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी व्यक्त केली. टिळक भवन येथे ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून, फटाके फोडून विजय साजरा करण्यात आला.