पुणे : आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेल्या भारतीय जनता पक्षाने शहरातील प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच येत्या पाच जानेवारी रोजी ‘घर चलो’ अभियानही राबविले जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि पक्ष म्हणून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही या यशामध्ये फार रममाण न राहता भाजपने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपने सदस्यनोंदणी मोहीम राबविण्याचे निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा मंगळवारी झाली. त्या वेळी प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगांवकर, राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, महेश पुंडे, राजेंद्र शिळीमकर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक

शहर सदस्यता अभियानप्रमुख राघवेंद्र मानकर यांनी प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांसमोर ठेवले. तसेच, ५ जानेवारी रोजी ‘घर चलो’ अभियान राबविण्यात येणार असून, नागरिकांना सदस्य करून घेण्याची सूचना त्यांनी केली. पीयूष कश्यप यांनी सदस्यता नोंदणीसंदर्भात सर्व तांत्रिक गोष्टींची माहिती कार्यकर्त्यांना दिली. सदस्य नोंदणीसाठी ८८००००२०२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही कश्यप यांनी केले.

शहरातील सदस्य नोंदणीची संख्या राज्यात सर्वाधिक पाहिजे, असे आवाहन प्रभारी जगदीश मुळीक यांनी केले. दर सहा वर्षांनी सदस्यता अभियान होते. निवडणूक असलेली राज्ये सोडून इतर ठिकाणी ९ कोटी सदस्य झाले आहेत. लोकशाही पद्धतीने संघटनेच्या निवडणुका होतात. पुणे शहरात विधानसभेला पडलेल्या मतांपेक्षा जास्त नोंदणी झाली पाहिजे, अशी सूचना या वेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

सक्रिय सदस्य होण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कमीत कमी ५० सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून ८० हजार ते एक लक्ष नोंदणी झाली पाहिजे, असेही आवाहन महाडिक यांनी केले.

हेही वाचा – पुणे : थेऊर येथे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीवर गुन्हा दाखल

शहरात कार्यकर्त्यांची मोठी साखळी असून, १० लक्ष सदस्य करण्याची क्षमता आहे. शहरातील सर्व जुने आणि सध्या कार्यरत असलेले असे १० हजार कार्यकर्ते यात सहभागी होतील, असे शहराध्यक्ष घाटे यांनी सांगितले.

Story img Loader