मावळ, शिरूरमधील सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नोव्हेंबर-डिंसेंबरमध्ये राज्यभराचा राजकीय दौरा करणार असून त्याची सुरुवात तीन नोव्हेंबरला पिंपरी-चिंचवड शहरातून होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निगडीत होणाऱ्या अटल संकल्प महासंमेलनात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, खासदार या वेळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचा मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपने शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे.

प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानात शनिवारी (३ नोव्हेंबर) दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महामेळाव्यासाठी शहर भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी लाखभर नागरिक जमवण्याचे भाजपचे नियोजन आहे. रावसाहेब दानवे यांनी चिंचवडला येऊन पदाधिकाऱ्याची बैठक घेतली आणि गर्दी जमवण्यासाठी सर्वाना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. मावळ आणि शिरूर मतदारसंघातील पक्षाच्या सर्व आमदारांनाही त्यांनी या कामाला लावले आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा कब्जा असून दोन्हीही मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. स्वबळावर लढण्याची वेळ आल्यास त्या दृष्टीने दोन्हीही मतदारसंघातील भाजपच्या ताकदीची चाचपणी या निमित्ताने करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री नोव्हेंबर-डिंसेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात दौऱ्यावर जाणार आहेत. त्याची सुरुवात निगडी प्राधिकरणातील या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. भाजपच्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp in pune
Show comments