हास्यविनोद, कोणत्याही विषयावर बिनधास्त मतप्रदर्शन, वागण्याबोलण्यातला वैदर्भीय मोकळेढाकळेपणा, तर कधी शिवराळ भाषा.. भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांचे असे नेहमीचे दिलखुलास रूप गुरुवारी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना अनुभवता आले आणि एकदम रिलॅक्स मूडमधील नितीनजींना पाहून पदाधिकाऱ्यांनाही हुरूप आला.
पक्षाध्यक्षपद सोडावे लागल्यानंतर गडकरी गुरुवारी प्रथमच पुण्यात आले. विरोधी पक्षनेता एकनाथ खडसे यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त ते आले होते. त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हेही होते. विवाह समारंभानंतर दुपारी बाराच्या सुमारास शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांची भेट घेण्यासाठी ते रुग्णालयात गेले. रुग्णालयात पोहोचल्यापासून ते दुपारी चारच्या सुमारास औरंगाबादला जाईपर्यंत नेहमीचे दिलखुलास गडकरी पक्षपदाधिकाऱ्यांनी अनुभवले. प्रा. मठकरी यांच्या भेटीनंतर तेथे उपस्थित पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी अर्धा-पाऊण तास गप्पा मारल्या. त्यानंतरही विमानतळावर जाईपर्यंत गाठीभेटी, गप्पा, चर्चा असाच कार्यक्रम सुरू होता.
या चर्चेत राष्ट्रीय राजकारणापासून ते अगदी पुण्यातील राजकारणापर्यंत आणि पक्षातील राजकारणापर्यंत सर्व विषयांवर गडकरी यांनी दिलखुलास टोलेबाजी केली. ते आता अध्यक्षपदावर नाहीत याचा ताण पदाधिकाऱ्यांवरच अधिक होता. मात्र, खुद्द गडकरी यांच्यावर तसा कोणताही ताण नव्हता आणि त्यांच्या चर्चेत तो विषयही आला नाही. विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला बगल न देता ते मोकळेपणानी उत्तरे देत होते. विदर्भात माझ्या भागातून मी लोकसभेला पाच-सहा सीट आणणार म्हणजे आणणार. कारण मी तेथे तेवढे काम केले आहे. सर्व वर्गातून मला पाठिंबा आहे. लोक माझ्यामागे आहेत, असेही ते आत्मविश्वासाने सांगत होते.
या गप्पांमध्ये अधूनमधून शिवराळ भाषाही येत होती, तर कधी टोमणेही येत होते. बसने माणसे आणायला मला आवडत नाही. मी क्वालिटी मानणारा माणूस आहे. मला क्वालिटीने काम करायला आवडते. प्रेमाने काम करायला आवडते. सुधीर मुनगंटीवर यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष करा, अशीही आग्रही विनंती यावेळी पदाधिकाऱ्यांनी गडकरी यांना केली. एकुणातच, गडकरी यांचा मूड उत्साही होता. तणाव तर नव्हताच, उलट, आत्मविश्वास दिसत होता. उत्स्फूर्त भूमिकेतील असा नेता दिसल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्येही हुरूप आल्याचे दिसत होते.

Story img Loader