पुणे : मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या घाटावरील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील भाजपचा आणि महायुतीतील नवीन मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत महायुतीनेही सावध पावले टाकत अद्याप मतदारसंघ कोणाला सुटणार हे जाहीर केले नाही. महायुतीकडून खासदार बारणे यांना जर उमेदवारी मिळाली. तर, त्यांच्यासाठी घाटावरील वाढता विरोध डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळ लोकसभा मतदारसंघ रायगड आणि पुणे जिल्ह्यात विभागलेला आहे. या मतदारसंघावर पुणे जिल्ह्याचेच वर्चस्व राहिले आहे. सलग तीनवेळा पिंपरी-चिंचवडकडे प्रतिनिधित्व आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपचे तत्कालीन नगरसेवक आणि आताचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांनी बारणे यांचे मनापासून काम केले. त्यांना मावळातून मताधिक्य मिळवून दिले होते. परंतु, आता ते दोघेही विरोधात दिसत आहेत. आमदार शेळके उघडपणे तर भेगडे यांचे कार्यकर्ते जाहीरपणे खासदार बारणे यांना विरोध करताना दिसून येत आहेत. महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरीतील पदाधिकाऱ्यांनीही मावळची उमेदवारी राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> बेदाणा उत्पादनात मोठी घट होणार…जाणून घ्या का?

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी अधिकारी आणण्यावरून आमदार शेळके आणि खासदार बारणे यांच्यात मतभेद वाढले. तेव्हापासून शेळके यांचा बारणे यांना विरोध वाढल्याचे दिसून येत आहे. तर, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्याने आणि विद्यमान आमदार शेळके असल्याने विधानसभेला मतदारसंघ शेळके यांनाच सुटेल, हे गृहीत धरून भेगडे यांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. भेगडे यांचे कार्यकर्ते खासदार बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करताना दिसतात. लोकसभेला संधी मिळाली नाही. तर एखादे राजकीय आश्वासन घेता येईल, या दृष्टीने भेगडे यांनीही जोर लावल्याचे दिसते. पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही कमळावर उमेदवार असावा, अशी भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मागीलवेळी पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने त्याचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादीने विरोधी सूर आवळल्याची चर्चा आहे. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. एकंदरीतच खासदार बारणे यांना स्वत:चा हक्काचे मतदार असलेल्या घाटावरील पिंपरी-चिंचवड, मावळमधून विरोध वाढत आहे. घाटावरील वाढता विरोध त्यांची डोकेदुखी वाढविणारा आहे.

हेही वाचा >>> अष्टविनायकांचे दर्शन २४ तासांत होणार

घाटाखाली शांतता मावळ मतदारसंघात पुणे आणि रायगड जिल्ह्यातील तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. पुणे जिल्ह्यातील घाटावरील मावळ, पिंपरीत राष्ट्रवादीचे तर चिंचवडला भाजपच्या आमदार आहेत. तर, घाटाखालील भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले जाते. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी भाजपशी संलग्न आहेत. कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार असून लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे घाटाखाली शांतता दिसून येत आहे. उघडपणे बारणे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp insists on maval seat oppose to shrirang barne pune print news ggy 03 zws