पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून अयोध्या येथील राम मंदिराच्या लोकार्पणातून वातावरणनिर्मिती केली जात असतानाच पुण्यातील इच्छुक उमेदवारही श्रीरामरंगी रंगल्याचे चित्र आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारपासून ‘अपने अपने राम’ हा उपक्रम हाती घेतला असून, अन्य इच्छुक उमेदवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व संघप्रचारक सुनील देवधर यांनी ‘श्रीराम रंगी रंगले’ हा दोन दिवसांचा उपक्रम आयोजित केला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची नावे पहिल्यापासून चर्चेत आहेत. या दोघांनीही गेल्या काही महिन्यांपूर्वी विविध कार्यक्रम हाती घेत तसे स्पष्ट संकेत दिले होते. त्यातच मुळीक यांनी बागेश्वर बाबा यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते.

मोहोळ आणि मुळीक यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल, अशीच चर्चा सुरू असताना देवधर यांचे नाव पुढे आले. त्यांची विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती, पक्षाच्या प्रमुख नेत्या-पदाधिकाऱ्यांच्या भेटी सुरू झाल्या असून, विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. समाजमाध्यमातही ते सक्रिय झाले असून, सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थितीही वाढली आहे. त्यातच भाजपने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्द्यावरून वातावरण निर्मिती सुरू केली असतानाच या दोघांनीही या संदर्भात विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

प्रभू श्रीरामाची १०० फूट भव्य रंगावली, रामचरित्रावर अखंड गायन, भजन आणि नृत्य सादरीकरण, श्री रामायणावरील १२५ चित्रांचे प्रदर्शन, प्रसादवाटप, प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती अशा नानाविध कार्यक्रमांची रेलचेल असलेला ‘श्रीरामरंगी रंगले’ उपक्रम देवधर यांनी येत्या शनिवारी आणि रविवारी (२० आणि २१ जानेवारी) सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत आयोजित केला आहे. विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : सांगलीत भाजपच्या पालकमंत्र्यांवर अजित पवारांची कुरघोडी !

दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनीही गुरुवारपासून ‘अपने अपने राम’ हा तीन दिवसांचा उपक्रम आयोजित केला आहे. अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार असल्याने पुणेकरांना रामचरित्र आणि त्यातील तत्त्व, जीवन, भक्ती यांचा विचार आणि अनुभव घेता यावा यासाठी प्रसिद्ध तत्त्वज्ञ डाॅ. कुमार विश्वास विचारसत्रे गुंफणार आहेत. यापूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले हेमंत रासने यांनी गेल्या रविवारी ‘रामरक्षा देशासाठी, एक सकाळ रामासाठी’ हा उपक्रम राबविला होता. त्यामुळे भाजपचे पुण्यातील इच्छुक उमेदवार ‘श्रीरामरंगी’ रंगल्याचे चित्र आहे.

Story img Loader