“भाजपा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात राजकारण करत आहे. त्यांचं हे कृत्य लोकशाहीसाठी घातक आहे.” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्याच्या बोपोडीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल. तेव्हा, विधानसभा अध्यक्षांची निवड होईल अस त्यांनी यावेळी सांगितलं.
तसेच, या वेळी नाना पटोले यांनी, “भाजपा राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकरण करत आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या दिवशीपासून पहाटेचे सरकार पडले तेव्हापासून मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन ही भूमिका घेऊन सत्तेचे दिवसा स्वप्न पाहात आहेत.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा देखील साधला.
ते पुढे म्हणाले की, “राज्यात अस्थिरता कशी निर्माण केली जाईल आणि राज्याचा विकास होणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे राजकारण केल जात आहे. ते कृत्य लोकशाहीसाठी घातक आहे.”
याचबरोबर, “विधानसभा अध्यक्षांचा पेच लवकरच सुटेल. नऊ महिने झालं करोनाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अधिवेशन होऊ शकलं नाही. पाच दिवसांच अधिवेशन पार पडलं. मात्र अध्यक्षांच्या निवडीबाबत संविधानिक आणि तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळं ती निवड पुढं ढकलण्यात आली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल. तेव्हा, विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. तसं नियोजन झालं आहे.” अस पटोले म्हणाले आहेत.