राज्याचे वनमंत्री संजय राठोड सध्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. त्यांचं नाव या प्रकरणात आल्यामुळे विरोधकांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, पोलिसांनी या प्रकरणात संजय राठोड यांचंही नाव अहवालात घेऊन FIR दाखल करावा, अशी मागणी देखील केली जात असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर आज तीव्र शब्दांत निशाणा साधला. संजय राठोड यांच्या भेटीवेळी पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दीनंतर आता तिथे २२ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, असं सांगत चित्रा वाघ यांनी संजय राठोड आणि वाशिम पोलिसांनाही सुनावले आहे.

“संजय राठोड पोलिसांना दिसतच नाहीत”

संजय राठोड पुणे पोलिसांनाही दिसत नाहीत आणि वाशिम पोलिसांनाही दिसत नाहीत, असा खोचक टोमणा चित्रा वाघ यांनी मारला आहे. “ते दिसतच नाहीत. संजय राठोड मिस्टर इंडिया झालेत की काय कळत नाही. पुणे पोलिसांना तर दिसत नाहीच, वाशिमच्या पोलिसांना देखील दिसत नाहीत. इतका मोठा माणूस आहे. किमान पाच – साडेपाच फुटांचा तरी माणूस असेलच. पण वाशिम आणि पुण्याच्या पोलिसांनी डोळे बंद करून ठेवले आहेत. संजय राठोड म्हणजे डोळे बंद. पण नुसता करोनाचा गुन्हा दाखल करू नका. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अमरावतीमध्ये आंदोलन करताना माझ्यावर गुन्हा दाखल केला. पण आता गुन्हा दाखल का केला जात नाही?” असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

“निर्दोष असल्याचं सांगण्यासाठी संजय राठोडने लाखांची गर्दी जमा केली. ज्यांनी हे आयोजन केलं, त्या महंतांपेकी पोहरादेवीचे ट्रस्टी कबीर महाराज यांच्या घरी ६ जण करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्या गावात २२ करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. याची जबाबदारी कोण घेणार?”, असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ यांनी गुरुवारी सकाळी पूजा चव्हाण राहात असलेल्या इमारतीमध्ये पाहणी केली. यानंतर त्यांनी वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल का झाला नाही? याविषयी विचारणा केल्यानंतर तिथले वरीष्ठ पोलीस निरीक्षक लगड यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा देखील आरोप त्यांनी केला.