आपल्या वक्तव्यामुळे नेहमी वादात अडकणारे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका तर केलीच शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपात आणा असा सल्लाही देऊन टाकला. मावळ येथील पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपामध्ये आणून आपले आंबे खराब करू नका, अशी असा टोला त्यांनी लगावला. शिवाय शिवसेना भाजपाचा मित्र पक्ष असल्याने त्याचे कार्यकर्ते भाजपात आले तर येऊ द्या, असे म्हणत शिवसेनेचे कार्यकर्ते फोडा असा अप्रत्यक्ष सल्लाच त्यांनी दिला.
राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते आणू नका, शिवसेनेतील कार्यकर्ते येऊद्यात ते आपले मित्र पक्ष आहेत. राष्ट्रवादीमधील एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे राष्ट्रवादीमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून आपले आंबे सडवू नका, अशी टीका बापट यांनी केली. हल्लाबोलसारख्या कार्यक्रमांनी महाराष्ट्रातील जनता फसणार नाही. जनतेला प्रत्यक्ष काम कोण करतं हे माहीत आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात भाजपाच्या नेतृत्वात काम करेल ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, असं बापट म्हणाले. भाजपा पक्ष नसून एक कुटुंब आहे. याचा अनुभव शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना येईलच. तुम्ही आता या कुटुंबात आला आहात, तुमचं दुःख ते आमचं असेल, इतकं संवेदनशील राहू असं बापट म्हणाले. मावळ मधील मातीने मला मोठं केलं आहे, याची जाणीव असल्याचे ते म्हणाले.