पुणे : Girish Bhalchandra Bapat Death पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान भाजप खासदार गिरीश भालचंद्र बापट (७२) यांचे प्रदीर्घ आजाराने बुधवारी दुपारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी गिरिजा, मुलगा गौरव, स्नुषा स्वरदा आणि नात असा परिवार आहे. बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या बापट यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव शनिवार पेठेतील अमेय अपार्टमेंट या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह राजकीय, समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, गणेश मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी नेईपर्यंत अंत्यदर्शन घेणाऱ्यांची रांग लागली होती.
पोलीस घोष पथकाने सुरावटीतून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिलेली मानवंदना आणि मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून केलेले अभिवादन अशा शोकाकुल वातावरणात गिरीश बापट अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सायंकाळी पाच वाजता फुलांनी सजविलेल्या उघडय़ा वाहनातून बापट यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. ‘गिरीश बापट अमर रहे’ आणि ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ अशा घोषणा देण्यात आल्या. ॐकारेश्वर मंदिर, रमणबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, पोलीस आयुक्त रितेश कुमार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, लोकसभा अध्यक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पुष्पचक्र अर्पण केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतातून बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. पार्थिव लपेटलेला तिरंगा कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्यानंतर बापट यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
माणसे जोडणारा नेता गमावला!, सर्वपक्षीय नेत्यांकडून गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा
चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत पुणेकर आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच त्यांनी काम केले. बापट यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत.
– शरद पवार, ज्येष्ठ नेते
बापट यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. गेल्या काही दिवसांत दोनदा बापट यांची भेट घेतली. एखाद्या योद्धय़ाप्रमाणे त्यांनी आजाराशी संघर्ष केला. बापट यांनी कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार असा थक्क करणारा त्यांचा प्रवास होता. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले. आयुष्यभर त्यांनी माणसे जोडली. आजारपणातही त्यांनी कसब्यात प्रचार करून राष्ट्र प्रथम, मग संघटन आणि मग व्यक्ती हे ध्येय आयुष्यभर त्यांनी पाळले.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
जनसामान्यांशी जोडलेला, जमिनीवरची माहिती असलेला अत्यंत हजरजबाबी, उत्तम संसदपटू अशी त्यांची ओळख होती. माझ्या मंत्रिमंडळात संसदीय कार्यमंत्री म्हणून उत्तम नियोजन करायचे. त्यांच्या सर्वपक्षीय उत्तम संबंधांमुळे कितीही कठीण परिस्थिती आली, तरी सभागृहात योग्य मार्ग काढण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. पुण्याच्या विकासातले त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
खासदार गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिले जायचे. संघाच्या मुशीत तयार झालेल्या भाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचे राजकारण केले. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत भाऊंना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले.
– अजित पवार, विरोधी पक्षनेते
भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे.
– उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापट यांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
राजकीय वाटचालीत त्यांनी स्वत:चा कार्यकर्त्यांचा पिंड मात्र सोडला नाही. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे चांगले मित्र होते. पुण्याच्या विकासात त्यांनी भरीव योगदान देताना विकासात कधी राजकारण आणले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली, मात्र तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. समाजातील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला.
– मोहन जोशी, माजी आमदार
महाराष्ट्रात भाजपच्या वाढीत बापट यांचे मोलाचे योगदान आहे. आमदार म्हणून त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले. मंत्री तसेच खासदार म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यांचे काम प्रेरणादायी आहे.