पुणे : काँग्रेस इंडिया आघाडीकडे मुद्दे नसल्याने राज्य घटना बदलण्याचा संभ्रम निर्माण करत आहे. राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व बदलता येत नाहीत. इंदिरा गांधी यांनीच घटनेची मोडतोड केली. ८० वेळा काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली. जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.

महाराष्ट्राला गेल्या पाच वर्षांत ५ लाख कोटी रुपये दिले. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण असे प्रश्न आहेत. स्वारगेटसारखी गर्दी विमानतळावर होते. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्याला आता नवीन पुण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ नातूबाग मैदान येथे झालेल्या प्रचार सभेत गडकरी बोलत होते. अमोक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, रुपाली पाटील ठोंबरे, किरण साळी, हेमंत रासने, स्वरदा बापट, श्रीनाथ भिमाले, शैलेश टिळक, अॅड. मंदार खरे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : इंग्रजांना घालवले तर मोदी काय चीज? शरद पवार यांचा सवाल

गडकरी म्हणाले, की गिरीश बापट आणि मुक्ता टिळक प्रचार सभेत नाहीत असे पहिल्यांदाच होत आहे. पुण्याची मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न सुटत नव्हता. संरक्षण विभागाकडून परवानगी घेऊन विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला. तसेच मेट्रोच्या बाबतीतही झाले. या दोन्हीची कामे वेगाने झाली. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत जाता येईल असा रस्ता करत आहोत. पुणे बेंगलोर मार्गाचे कामही सुरू होणार आहे. पुणे नाशिक, तळेगाव-चाकण-शिक्रापूर डबलडेकर उड्डाणपूल होणार आहे. किवळे तेनललेपूल नवा उन्नत मार्ग करण्यात येणार आहे. १२ हजार कोटी खर्च करून पालखी मार्ग केला आहे. त्याचे उद्घाटन निवडणुकीनंतर होणार आहे. काश्मीरला कन्याकुमारीशी रस्त्याने जोडण्याचे स्वप्न डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. मोदी सरकारने उद्योग, रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर दिला आहे. त्यामुळे निर्यात तीन पट वाढली आहे. देश प्रगतीपथावर आहे. आयात कमी करून निर्यात वाढवली पाहिजे. इंडियन ऑईल इथेनॉलचे ३०० पंप सुरू करणार आहे. नदी काठसुधार प्रकल्पातून पुण्याचे सौंदर्यीकरण होणार आहे.

दरिद्री नारायणाला परमेश्वर मानून आम्ही कार्यरत आहे. २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर पडले, तर देशात गरिबी राहणार नाही. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन म्हणजे सेक्युलरिझम नाही. मी जे बोलतो, ते करतो, जे करतो, ते सांगतो. मी बोललो ते केले नाही दाखवणारा एकही माय का लाल पैदा झाला नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुंडांची झाडाझडती

माझी चूक झाली

पुणे वर्तुळाकार मार्गाचे काम आता होत आहे. माझी एक चूक झाली, ती म्हणजे मुंबई पुणे एक्प्रेस हायवेचे काम करताना २५ वर्षांचा विचार करून काम करायला हवे होते. पण आता वर्तुळाकार मार्गामुळे वाहतुकीची समस्या सुटणार आहे. महामार्गावरील वाहतूक शहरात येणार नाही, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

Story img Loader