पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज (रविवारी) भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. शिवसेनेने भाजपकडे ३२ जागांची मागणी केली आहे. भाजपला हव्या असलेल्या ३२ जागाांची मागणी शिवसेनेने केल्यामुळे यावर निर्णय घेण्यास वेळ लागत असल्याचे या बैठकीनंतर भाजपचे खासदार अमर साबळे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या युतीसाठी भाजपच्या नेत्यांची शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेने दिलेल्या प्रस्ताव भाजपकडून अमान्य करण्यात आला. त्यामुळे आता पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट उद्या (सोमवारी) बैठक घेणार आहेत. भाजप शिवसेनेकडून जागा वाढवून मागणार आहे आणि उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेसोबत पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, सचिन पटवर्धन उपस्थित होते.