पुणे : भारतीय जनता पक्षाने तीन महिन्यांत पुण्यातील तीन मोठे नेते गमावले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे जानेवारीमध्ये निधन झाले. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. तर कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचे फेब्रुवारीत निधन झाले. टिळक यांनीही कर्करोगाशी झुंज दिली होती.
हेही वाचा >>> गिरीश बापटांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं, अजित पवारांनी व्यक्त केला शोक
आजारी असतानाही जगताप आणि टिळक यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतील मतदानासाठी हजेरी लावली होती. तर आता खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. बापट गेली चार दशके पुण्याच्या राजकारणात होते. महापालिका ते लोकसभा हा प्रवास बापट यांनी केला. तसेच पुण्याचे कारभारी म्हणून बापट यांचे नाव घेतले जात होते. गेल्या तीन दशकांत बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाची कौशल्याने बांधणी करून त्याला भाजपचा बालेकिल्ला केला होता. मात्र मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवेळी आजारी असल्याने बापट सक्रीय नव्हते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे बऱ्याच वर्षांनी या मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला.