विधानसभेची निवडणूक महायुती लढणार असल्यामुळे पूर्वीचे भाजप-शिवसेना युतीचे जागावाटपाचे सूत्र आता गैरलागू आहे. त्यामुळे आता जागा वाटपासाठी नव्याने सूत्र अवलंबावे लागेल, अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी येथे बोलून दाखवली. भाजपला अच्छे दिन आल्यामुळे अनेक संधिसाधू पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, विधानसभेसाठी उमेदवारीची अपेक्षा ठेवून येणाऱ्या संधिसाधूंना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपतर्फे निवडणूक संचालन समितीची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भंडारी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पूर्ण यश मिळवून सत्ता मिळवण्यासाठी महायुतीची व्यूहरचना सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोहीम राबवली जाणार आहे. केंद्रीय मंत्री देखील या मतदारसंघासाठी एक दिवस देणार आहेत. त्यांच्या दौऱ्यांमध्ये जो प्रचार केला जाईल तो फक्त भाजपचा नसेल, तर महायुतीचा प्रचार करण्याचे नियोजन आहे.
महायुतीमधील घटक पक्षांची तयारी सुरू असून जागावाटपाचीही चर्चा योग्य पद्धतीने सुरू आहे. येणारी निवडणूक महायुती लढवणार असल्यामुळे युतीचे जे जागावाटपाचे सूत्र होते ते यावेळी गैरलागू आहे. त्यामुळे या वेळी जागावाटपाचे सूत्र थोडे बदलावे लागेल, अशीही शक्यता त्यांनी वर्तवली.
संधिसाधूंना पक्षात प्रवेश नाही
भाजपमध्ये येण्यासाठी अन्य पक्षातील अनेकजण इच्छुक असले, तरी इतर पक्षातील कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया पक्षाने सुरू केलेली नाही. विधानसभेची निवडणूक असल्याने उमेदवारीसाठी अनेक संधिसाधू पक्षात येण्यास उत्सुक आहेत. मात्र त्यांची कोणतीही अट मान्य केली जाणार नाही. पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा याचे निकष पक्ष ठरवणार आहे. सरसकट सर्वाना प्रवेश दिला जाणार नाही, असे भंडारी यांनी या वेळी सांगितले.
युतीचे पूर्वीचे जागावाटपाचे सूत्र आता गैरलागू – भंडारी
भाजपला अच्छे दिन आल्यामुळे अनेक संधिसाधू पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, विधानसभेसाठी उमेदवारीची अपेक्षा ठेवून येणाऱ्या संधिसाधूंना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही.
First published on: 22-08-2014 at 03:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mahayuti seat election madhav bhandari