साधेपणा हा व्यक्तिगत चारित्र्याशी संबंधित विषय आहे. तो जाहिरातबाजीचा विषय होऊ शकत नाही. एखादा राजकीय नेता साधा राहतो म्हणजे तो उत्कृष्ट काम करेलच असे नाही, असे प्रतिपादन करत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता साधेपणावर भाष्य केले.
गोव्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पर्रीकर यांचा प्रचारदौरा सुरू झाला असून रविवारी ते पुण्यात आले. अरविंद केजरीवाल यांच्या साधेपणाचा मोठा गवगवा होतो. तुम्ही देखील गोव्याचे मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही देखील अतिशय साधे राहता. मात्र, तुमच्या साधेपणाची चर्चा घडवण्यात तुम्ही कमी पडता असे वाटते का, असा प्रश्न विचारला असता पर्रीकर म्हणाले, की मी साधेपणाने राहत असेन, तर तो साधेपणा माझ्या व्यक्तिगत चारित्र्याशी संबंधित आहे. साधेपणा हा जाहिरातीचा विषय होऊ शकत नाही. अर्थात एखादी व्यक्ती वा नेता साधा राहतो म्हणून तो चांगली कामगिरी करू शकेलच असे मात्र नाही. जेथे साधेपणाने राहणे शक्य आहे तेथे तसे राहावे. मात्र, जेव्हा काम आणि लागणारा वेळ यांचा प्रश्न येतो, तेव्हा मी देखील सोयी-सुविधा वापरतो. गोव्यातून दिल्लीला रेल्वेने गेल्यास कमी खर्च येतो; पण माझा वेळ महत्त्वाचा असेल, तर मला विमानानेच जावे लागते. अशावेळी मी विमानाने जातो. मात्र, विमानाचा प्रवास ‘इकॉनॉमी क्लास’ने करतो. कामांच्या दृष्टीने काही सोयी-सुविधा वापराव्याच लागतात.
गोव्यात या वेळी विक्रमी मतदान झाले असून गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा विजय होईल, असे सांगून ते म्हणाले की, भाजपच्या प्रचारात देशभर विकासासाठी गुजरात मॉडेल असा उल्लेख केला जात असला, तरी ते वास्तविक भाजपचे विकासाचे मॉडेल आहे. भाजपशासित सर्वच राज्यांमध्ये हे मॉडेल वापरले जात आहे. महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे, तसेच भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, प्रदीप रावत, प्रा. श्रीपाद ढेकणे, राजेश पांडे हेही या वेळी उपस्थित होते.
‘मी गोव्यातच ठीक आहे’
केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यानंतर पर्रीकर केंद्रीय मंत्रिमंडळात जातील अशी चर्चा सुरू असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, की मी गोव्यातच ठीक आहे. गोव्यातील जनतेने मला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे गोव्यात राहून मुख्यमंत्री परिषद तसेच केंद्राला साहाय्य करण्यासाठी अशा अन्य ज्या समित्या वगैरे असतील, त्या माध्यमातून मी केंद्राला साहाय्य करू शकेन.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा