आणखी एक अहवाल बाकी असल्याने कारवाई होत नाहीये

पिंपरी- चिंचवड : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

दरम्यान, तनिषा सुशांत भिसे यांच्या दोन मुलींचं सामाजिक भान ठेवून १८ व्या वर्षांपर्यंत मंगेशकर कुटुंबाने मातृत्व स्वीकारावं अशी मागणी भाजपा आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अमित गोरखे म्हणाले, चॅरिटी कमिश्नर आणि यमुना जाधव एकत्रित समितीचा अहवाल काल सकाळी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. तो अहवाल मी पाहिलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो अहवाल माहीत आहे. पुढे ते म्हणाले, माता मृत्यू अहवाल येणे बाकी आहे. हे सर्व अहवाल भिसे कुटुंबीयांच्या बाजूने असतील, असा विश्वास गोरखे यांनी व्यक्त केला.

पुढे ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे काम पूर्वीपासून चांगलं आहे; पुढे ही ते असेच करत राहतील. परंतु, डॉ. घैसास यांच्याकडून चूक झाली. त्यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. राजीनामा महत्त्वाचा नाही. डॉ. घैसास असतील किंवा इतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मंगेशकर कुटुंबीयांनी सामाजिक भान ठेवून त्या दोन मुलींचं मातृत्व १८ व्या वर्षांपर्यंत घेतलं पाहिजे. अशा घटनांमध्ये संस्था जबाबदार असते.

पुढे ते म्हणाले, याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने समिती गठीत करून अहवालदेखील मान्य केला आहे, हे बघता कारवाई लवकर होईल असं वाटत आहे. या प्रकरणी योग्य निर्णय घेतला जाईल. प्रकरण मागे पडणार नाही. एक अहवाल बाकी असल्याने कारवाई होत नाही, तो अहवाल आज येईल अशी अपेक्षा आहे. आजच त्यासंबंधी कारवाई होईल अशी अपेक्षा आहे, असेही अमित गोरखे यांनी म्हटले आहे.