पिंपरी: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महा-ई-सेवा केंद्रांकडून विद्यार्थी, नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची तक्रार भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. दोषी केंद्रचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जगतापांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे जिल्ह्यासह या दोन्ही शहरातील महा-ई-सेवा केंद्रे म्हणजे नागरिकांना लुटणारी केंद्रे बनली आहेत. शैक्षणिक व विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक दाखले देण्यासाठी या केंद्रांवर निश्चित केलेल्या दरांपेक्षा कितीतरी पटीने पैसे घेतले जात आहेत. विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड लूट सुरू आहे, याकडे आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा >>> ‘आधार’मधील माहिती अद्ययावतीकरणाचा प्रायोगिक प्रकल्प पुण्यात ; आधार अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे व पिंपरी पालिका क्षेत्रातील महा-ई-सेवा केंद्रातून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचे, जातीचे, अधिवास, नॉन क्रिमिलेअर आदी विविध दाखले तसेच विविध शासकीय योजनांकरिता ४२ प्रकारचे दाखले वितरीत केले जातात. महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून निश्चित शुल्क दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही महसूल कर्मचारीही प्रत्येक दाखल्यामागे महा-ई-सेवा केंद्र चालकाकडून शुल्क घेतात. तहसील कार्यालयात असणाऱ्या सेतू केंद्रातही अशा प्रकारे पैसे आकारत असल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा >>> पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ऑनलाइन मिळकतींचा शोध घेण्याची सुविधा पूर्ववत

अनेक सेवा केंद्र हे मंजूर असलेल्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर कार्यक्षेत्रातही कार्यरत आहेत. काही सेवा केंद्रचालकांनी दुबार केंद्र इतर कार्यक्षेत्रात नियमबाह्यरित्या सुरु केले आहे. तर, काही सेवा केंद्रचालकांकडून परस्पर त्याच नावाने दुसरीकडेही अनधिकृतपणे केंद्र चालवण्यासाठी दिल्याचे दिसून येते. सेवा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करून त्यामार्फत केंद्र चालकांच्या मनमानी कारभाराला लगाम घालावा. नागरिकांच्या दाखल्यासाठी सशुल्क रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, कायमस्वरूपी दक्षता पथक नेमण्यात यावे व त्या पथकामार्फत नियमित तपासणी व धडक कारवाई करावी, अशी मागणी जगतापांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla laxman jagtap complaint to district collector about maha e seva kendra print pune news zws